scorecardresearch

रेल्वेच्या तिजोरीत चित्रपट चित्रीकरणातून पावणेतीन कोटी ; १० चित्रपटांचे चित्रीकरण

गेल्या आर्थिक वर्षांत म्हणजे २०२०-२१ मध्ये करोना निर्बंध असूनही ४१ लाख १६ हजार रुपयांचा महसूल मध्य रेल्वेने मिळवला होता.

railway
फाईल फोटो

नागपूर : करोना पश्चात चित्रपटांच्या चित्रीकरणास प्रारंभ झाला असून मध्य रेल्वेच्या विविध ठिकाणी चित्रीकरण झाल्याने रेल्वेच्या तिजोरीत दोन कोटी ४८ लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली.

मध्य रेल्वेने २०२१- २२ या आर्थिक वर्षांत चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी विविध परिसर आणि रेल्वेडबे भाडय़ाने देऊन २.४८ कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवले. कोणत्याही आर्थिक वर्षांत मध्य रेल्वेला मिळालेला हा सर्वाधिक महसूल आहे. विविध चित्रपट निर्माते आणि प्रॉडक्शन हाऊसद्वारे मध्य रेल्वेच्या वेगवेगळय़ा ठिकाणी सुमारे १० चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले, ज्यामध्ये ६ फीचर फिल्म्स, दोन वेब सिरीज, एक शॉर्ट फिल्म आणि जाहिराती यांचा समावेश आहे.

या आर्थिक वर्षांतील दोन कोटी ४८ लाख रुपये हे मध्य रेल्वेला चित्रपटाच्या चित्रीकरणातून मिळालेले आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पन्न असून २०१३-१४ या वर्षांतील एक कोटी ७३ लाखच्या आधीच्या सर्वाधिक उत्पन्नाला मागे टाकले आहे. गेल्या आर्थिक वर्षांत म्हणजे २०२०-२१ मध्ये करोना निर्बंध असूनही ४१ लाख १६ हजार रुपयांचा महसूल मध्य रेल्वेने मिळवला होता.

सीएसएमटीला निर्मात्यांची पसंती

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे चित्रपट निर्मात्यांसाठी सर्वाधिक पसंतीचे चित्रीकरण स्थान आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समाविष्ट असलेल्या या रेल्वेस्थानकावर यंदा ४ चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले, ज्यात अर्शद वारसी आणि चित्रांगदा सिंग अभिनीत ‘मॉडर लव्ह कटिंग चाय’ या चित्रपटाचा समावेश आहे. चित्रीकरणाच्या इतर ठिकाणांमध्ये दुसरे सर्वात लोकप्रिय जुने वाडीबंदर यार्ड, साताराजवळील अदारकी रेल्वे स्थानक, येवला, मनमाड आणि अहमदनगरमधील कान्हेगाव स्थानक, दादर, मुलुंड आरपीएफ मैदान आणि मुंबईकरांसाठी आकर्षण असलेले हिल स्टेशन, माथेरान रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानक, जुने वाडीबंदर यार्ड, वाठार (सातारा जवळ) आणि आपटा स्थानक (पनवेल परिसरातील) यांसारख्या लोकप्रिय ठिकाणांमुळे आणि प्रॉडक्शन हाऊसना कोणत्याही अडचणीशिवाय व विनाअडथळा परवानगी देण्याच्या पद्धतीमुळे मध्य रेल्वेला चित्रपटाच्या चित्रीकरणातून विक्रमी उत्पन्न मिळवता आले. – अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Central railway earns over rs 2 50 crore from film shoots zws

ताज्या बातम्या