अकोला: मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते हटिया आणि पुणे ते दानापूर दरम्यान प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त होळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते हटिया विशेष गाडीच्या चार फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०८६१० विशेष ०४ मार्च आणि ११ मार्च रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०५.०० वाजता सुटेल आणि हटिया येथे दुसऱ्या दिवशी १८.०० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०८६०९ विशेष ०२ मार्च आणि ०९ मार्च रोजी हटिया येथून १६.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ००.४० वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगांव, पाचोरा, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा आणि राउलकेला येथे थांबा आहे.
दोन वातानुकूलित द्वितीय, पाच वातानुकूलित तृतीय, दोन वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, सात शयनयान, चार सामान्य द्वितीय आणि एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन, एक जनरेटर कार अशी गाडीची संरचना आहे.
पुणे ते दानापूर विशेष गाडीच्या ६ सेवा होतील. गाडी क्रमांक ०१४७९ विशेष ०१ मार्च, ०५ मार्च आणि ०९ मार्च रोजी पुणे येथून १९.५५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसऱ्या दिवशी ०८.०० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४८० विशेष ०३ मार्च, ०७ मार्च आणि ११ मार्च रोजी दानापूर येथून १०.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १८.१५ वाजता पोहोचेल. या गाडीला दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, मदन महल , कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., बक्सर व आरा येथे थांबा राहणार आहे. एक वातानुकुलीत प्रथम, एक वातानुकुलीत द्वितीय, एक वातानुकुलीत तृतीय, ११ शयनयान, ५ सामान्य द्वितीय व २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन अशी गाडीची संरचना राहणार आहे.
विशेष गाडी क्रमांक ०८६१० यांचे आरक्षण ०२ मार्चपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच संकेतस्थळावर आगाऊ आरक्षण कालावधी अंतर्गत उपलब्ध होईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. या गाड्यांचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
