नागपूर : मध्य रेल्वेने होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्यांचे व्यापक नियोजन केले आहे. मुंबई, पुणे तसेच उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता फेब्रुवारी-मार्च २०२६ दरम्यान अतिरिक्त गाड्या चालवण्यात येणार आहेत.होळीच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – नागपूर रेल्वे स्थानक दरम्यान गाडी क्र. ०२१४१/ ०२१४२ साप्ताहिक विशेषच्या चार फेऱ्या धावणार आहेत.

गाडी क्र. ०२१४१ ही २२ आणि २४ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२.२० वाजता मुंबईहून सुटून त्याच दिवशी दुपारी ३.१० वाजता नागपूरला पोहोचेल. परतीची ०२१४२ ही गाडी नागपूरहून रात्री ८ वाजता सुटून पुढील दिवशी दुपारी १.३० वाजता मुंबईत येईल. दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

या गाडीत एसी द्वितीय, एसी तृतीय, स्लीपर, सामान्य द्वितीय तसेच जनरेटर व्हॅनची सुविधा असेल.तसेच पुणे रेल्वे स्थानक – नागपूर दरम्यान ०१४६९/०१४७० या विशेष गाडीच्या दोन फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ३ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.५० वाजता पुण्याहून सुटणारी गाडी पुढील दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल.

४ मार्च रोजी नागपूरहून सकाळी ८ वाजता सुटणारी परतीची गाडी रात्री ११.३० वाजता पुण्यात दाखल होईल. एलएचबी डब्यांसह या गाडीत एसी द्वितीय, एसी तृतीय आणि सामान्य श्रेणीची सोय असेल.याशिवाय ०१४५७/०१४५८ पुणे–नागपूर साप्ताहिक विशेष गाडीच्या दोन अतिरिक्त फेऱ्याही जाहीर करण्यात आल्या आहेत.

४ मार्च रोजी पुण्याहून सुटणारी गाडी पुढील दिवशी नागपूरला पोहोचेल, तर ५ मार्च रोजी नागपूरहून सुटणारी गाडी त्याच दिवशी पुण्यात येईल. उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर (अहिल्यानगर), कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे असतील. या गाडीत एसी प्रथम, एसी द्वितीय, एसी तृतीय, स्लीपर आणि सामान्य श्रेणीचे डबे उपलब्ध असतील.

दरम्यान, मध्य रेल्वेने यापूर्वीच २१६ होळी विशेष गाड्यांची घोषणा केली असून त्यात आणखी २४ गाड्यांची भर घालण्यात आली आहे. यात लोकमान्य टिळक टर्मिनस – कानपूर सेंट्रल तसेच पुणे/हडपसर–झांसी मार्गावरील गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण २४० विशेष गाड्या धावणार आहेत.या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण संगणकीकृत केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.

प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. होळीच्या काळात होणारी अतिरिक्त गर्दी सुरळीत हाताळण्यासाठी हे नियोजन करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.