Nagpur Railway / नागपूर : आगामी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी व मार्च २०२६ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर तसेच पुणे-नागपूर मार्गावर ‘ट्रेन ऑन डिमांड’ तत्वावर या गाड्या धावणार असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या मार्गावर गाडी क्रमांक ०२१४१/०२१४२ साप्ताहिक विशेष चार फेऱ्या करणार आहे. गाडी क्रमांक ०२१४१ ही २२ व २४ फेब्रुवारी २०२६ रोजी (रविवार व मंगळवार) रात्री १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटून त्याच दिवशी दुपारी ३.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल.

परतीची गाडी क्रमांक ०२१४२ नागपूरहून त्याच दिवशी रात्री ८ वाजता सुटून पुढील दिवशी दुपारी १.३० वाजता मुंबईत पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव व वर्धा येथे थांबे असतील. गाडीची रचना एक एसी द्वितीय, सहा सहा एसी तृतीय, नऊ स्लीपर, चार सामान्य द्वितीय, एक गार्ड ब्रेक व्हॅन व एक जनरेटर व्हॅन अशी राहील.

पुणे–नागपूर–पुणे मार्गावरही विशेष गाड्या धावणार आहेत. गाडी क्रमांक ०१४६९ ही ३ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.५० वाजता पुणे येथून सुटून पुढील दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक ०१४७० ही ४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता नागपूरहून सुटून त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पुण्यात दाखल होईल. या गाडीमध्ये ३ एसी द्वितीय, १५ एसी तृतीय, १ सामान्य द्वितीय सह गार्ड ब्रेक व्हॅन व १ जनरेटर व्हॅन (एलएचबी डबे) असतील.

तसेच गाडी क्रमांक ०१४५७/०१४५८ पुणे–नागपूर साप्ताहिक विशेष दोन सेवा देणार आहे. ४ मार्च रोजी दुपारी ३.५० वाजता पुण्याहून सुटणारी गाडी पुढील दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल. परतीची सेवा ५ मार्च रोजी सकाळी ८ वाजता नागपूरहून सुटून रात्री ११.३० वाजता पुण्यात येईल. या गाडीला उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर (अहिल्यानगर), बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव व वर्धा येथे थांबे असतील. प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.