नागपूर : रेल्वे प्रवासासाठी वैध तिकिटासोबत विहित मूळ ओळखपत्र बाळगणे आवश्यक असून, ते उपलब्ध नसल्यास प्रवाशावर विनातिकीट प्रवास केल्याप्रमाणे दंडात्मक कारवाई होऊ शकते. मध्य रेल्वेकडून ऑक्टोबरमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
तिकीट तपासणीवर विशेष भर
मध्य रेल्वेकडून १ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान स्थानकांसह रेल्वेगाड्यांमध्ये तिकीट तपासणी केली जाणार आहे. प्रवाशांकडील तिकिटांची सत्यता आणि वैधता तपासण्याबरोबरच सवलतीच्या दरातील तिकिटे, विशिष्ट आरक्षण कोटा आणि विविध पासच्या माध्यमातून केलेल्या आरक्षणांचीही पडताळणी केली जाणार आहे.
मूळ ओळखपत्र आवश्यक
सवलत किंवा विशिष्ट आरक्षण कोट्यांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले विहित मूळ ओळखपत्र सोबत ठेवावे लागणार आहे. एका तिकिटावर अनेक प्रवाशांचे आरक्षण असल्यास, त्या तिकिटावरील किमान एका प्रवाशाकडे तिकिटावर नोंदविलेले विहित मूळ ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
ओळखपत्र उपलब्ध नसल्यास लागू नियमांनुसार त्या तिकिटावरील सर्व प्रवाशांना वैध तिकिटाशिवाय प्रवास करणारे मानले जाऊ शकते. त्यामुळे आरक्षण करताना आणि प्रवासाला निघताना संबंधित कागदपत्रे सोबत असल्याची खात्री करण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
सवलत, पासचीही पडताळणी
विशिष्ट सवलती किंवा आरक्षण कोट्यांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे पात्रता सिद्ध करणारी मूळ कागदपत्रे आहेत की नाही, याचीही तपासणी केली जाणार आहे. ई-पास किंवा पीटीओवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही विहित मूळ ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे.
प्रवास सुरू करण्यापूर्वी ई-पास किंवा पीटीओच्या बदल्यात आवश्यक अधिकृत तिकीट अथवा पास प्राप्त केला आहे, याची खात्री प्रवाशांनी करावी. संबंधित कागदपत्रांमध्ये त्रुटी किंवा अनियमितता आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते.
अनारक्षित तिकिटांचीही तपासणी
अनारक्षित तिकिटांच्या सत्यतेची पडताळणी करण्यावरही मोहिमेत विशेष लक्ष दिले जाणार आहे. आवश्यकतेनुसार तिकीट तपासणी कर्मचारी ‘टीटीई ॲप’च्या माध्यमातून तिकिटांचे प्रमाणीकरण आणि पडताळणी करणार आहेत.
आरक्षण सुविधांचा गैरवापर, सवलती व विविध पासचा गैरवापर तसेच तिकीटविषयक अनियमितता रोखणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. त्यामुळे प्रवाशांनी वैध तिकीट, विहित मूळ ओळखपत्र आणि आवश्यक पात्रता कागदपत्रांसह प्रवास करावा, तसेच तपासणीदरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
