नागपूर : दिवाळी आणि छठ पुजे दरम्यान रेल्वेगाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होते. अनेक प्रवासी गावी जाण्यासाठी मोठ्या प्रवास करतात. परंतु, आरक्षण मिळणे कठीण झाल्याने काही प्रवासी सर्वसाधारण तिकीट घेऊन आरक्षित डब्यांमध्ये प्रवास करतात, तर काहीजण विनातिकीट प्रवास करत असल्याचे आढळून आले. अशा प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने २९ ऑक्टोबर रोजी व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत रेल्वेने तब्बल ११ लाख ८९ हजार ८७५ रुपयांचा दंड वसूल केला.

या विशेष मोहिमेचा उद्देश प्रवाशांमध्ये वैध तिकीट घेऊन प्रवास करण्याची सवय निर्माण करणे आणि रेल्वेच्या महसुलात वाढ करणे हा होता.
नागपूर विभागातील २२ गाड्यांमध्ये तपासणी करण्यात आली. या मोहिमेत ८० तिकीट तपासक, एक रेल्वे सुरक्षा दलाचा कर्मचारी आणि चार चीफ इन्स्पेक्टर सहभागी झाले होते. संपूर्ण कारवाईवर वाणिज्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखरेख केली.

तपासणीदरम्यान तिकीटविना प्रवास करणारे, चुकीचे तिकीट वापरणारे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाई करण्यात आली. एकूण १,९०७ प्रकरणांमध्ये दंड आकारण्यात आला असून, प्रत्येक तिकीट तपासकाने सरासरी २४ प्रकरणे निपटवून सुमारे १४,८७३ रुपये इतकी रक्कम वसूल केली. नागपूर विभागाने अनधिकृत प्रवासाविरुद्ध ठाम भूमिका घेतल्याचे या मोहिमेतून स्पष्ट झाले.

रेल्वे प्रशासनाने सांगितले की, अशा मोहिमा केवळ महसुलात वाढ करीत नाहीत, तर प्रवाशांमध्ये शिस्तबद्ध प्रवास संस्कृती रुजवितात. विनातिकीट किंवा चुकीच्या तिकीटासह प्रवास करणे हा गुन्हा असून, त्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. भविष्यातही अशा व्यापक तपासणी मोहिमा नियमितपणे राबविण्याचा निर्धार नागपूर विभागाने व्यक्त केला आहे. प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

सध्या रेल्वे गाड्या आणि प्रवाशांचे प्रमाण अत्यंत व्यस्त असून, प्रत्येक गाडीत प्रचंड गर्दी पाहायला मिळते. दिवाळी, छठ यांसारख्या सणासुदीच्या काळात रेल्वे तिकिटांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे आरक्षण मिळवणे अनेक प्रवाशांसाठी अवघड ठरते. परिणामी, काही प्रवासी सर्वसाधारण (जनरल) तिकीट घेऊन थेट स्लीपर कोच किंवा आरक्षित डब्यांमध्ये प्रवास करतात.

अशा प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून तिकीट तपासणीदरम्यान कारवाई केली जाते. रेल्वे तिकीट तपासक (टीटीई) हे अशा प्रवाशांकडून दंड आणि फरक रक्कम वसूल करतात. त्यामुळे टीटीईंच्या दंड वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासही मदत होते.