नागपूर : मध्य रेल्वेच्या प्रवासी सेवांमध्ये एप्रिल २०२६ पासून महत्त्वाचे बदल करण्यात येणार असून, त्यास रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे. या बदलांमध्ये काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या टर्मिनल स्थानकात फेरबदल, तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे. हे बदल टप्प्याटप्प्याने लागू होणार असून त्याचा परिणाम मुंबई, पुणे, नागपूर तसेच विदर्भ आणि देशाच्या दक्षिण भागाकडे जाणाऱ्या प्रवासी गाड्यांवर होणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून सुटणाऱ्या काही महत्त्वाच्या गाड्यांच्या टर्मिनलमध्ये बदल करण्यात आला आहे. यामध्ये १६३३१/१६३३२ सीएसएमटी–तिरुवनंतपुरम साप्ताहिक एक्स्प्रेस, १६३५१/१६३५२ सीएसएमटी–नागरकोइल द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आणि १६३३९/१६३४० सीएसएमटी–नागरकोइल (आठवड्यातून चार दिवस धावणारी) एक्स्प्रेसचा समावेश आहे. या गाड्यांचे टर्मिनल आता एलटीटीऐवजी त्यांच्या मूळ गंतव्य स्थानकांवर निश्चित करण्यात आले आहे.

याशिवाय २२६२९/२२६३० दादर–तिरुनेलवेली साप्ताहिक एक्स्प्रेसचे टर्मिनल दादर स्थानकाऐवजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे हलविण्यात आले आहे. त्यामुळे दादर परिसरातील प्रवाशांना प्रवासाच्या नियोजनात बदल करावा लागणार आहे.

वेळापत्रकात करण्यात आलेल्या बदलांमध्ये १२१११ सीएसएमटी-अमरावती एक्स्प्रेस आणि १२२८९/१२२९० सीएसएमटी-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसचा समावेश आहे. सीएसएमटी-अमरावती एक्स्प्रेस आता पूर्वीपेक्षा उशिरा सुटणार असून, अमरावती येथे पोहोचण्याची वेळही त्यानुसार बदलण्यात आली आहे. नागपूर दुरांतो एक्स्प्रेसच्या प्रवासकालावधीत आणि वेगात किरकोळ सुधारणा करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

या बदलांचा अप्रत्यक्ष परिणाम इतर अनेक गाड्यांच्या आगमन व प्रस्थान वेळांवरही होणार आहे. सीएसएमटी-हावडा, अहमदाबाद–पुरी, सीएसएमटी-विदर्भ एक्स्प्रेस, दादर-शिर्डी, अहमदाबाद-नागपूर, पुणे-नागपूर आदी गाड्यांच्या भुसावळ, बडनेरा, मनमाड, इगतपुरी यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवरील वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. मात्र इतर मार्गांवरील स्थानकांच्या वेळापत्रकात कोणताही बदल नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हे सर्व बदल १४ एप्रिल २०२६ पासून विविध तारखांना अंमलात येणार असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी अधिकृत सुधारित वेळापत्रक तपासूनच तिकीट आरक्षण व प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.