नागपूर : मध्य रेल्वेने इंजिनमधील बिघाड आधीच ओळखण्यासाठी स्मार्ट तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून चालकांना वेळेत सूचना देण्याची व्यवस्था केली आहे. तसेच इंजिन चालक (लोको पायलट) व सहाय्यकांना अधिक सुरक्षित व आरामदायक कार्यपरिसर उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.
रेल्वे इंजिन रेल्वे वाहतूक व्यवस्थेचे मुख्य घटक मानले जाते. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता टिकवणे अत्यावश्यक आहे. यासाठी मध्य रेल्वेने ‘इन-सीटू’ देखभाल पद्धत विकसित केली. यात ‘हेलिकल स्प्रिंग’ आणि ‘ॲक्सल बॉक्स’ यांसारखे महत्त्वाचे भाग कार्यशाळेत (शेड) बदलता येतात. ५० टन क्षमतेच्या हायड्रॉलिक पॉवर पॅक आणि विशेष स्लायडिंग यंत्रणेचा वापर करून हे काम केले जाते. त्यामुळे इंजिनला दुरुस्ती कार्यशाळेत हलवण्याची गरज उरत नाही.
या नव्या पद्धतीमुळे दुरुस्तीचा कालावधी लक्षणीयरित्या कमी झाला आहे. मनुष्यबळाची बचत होत आहे. इंजिन जास्त वेळ सेवेत उपलब्ध राहते. त्यामुळे रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर होणारे परिणाम कमी झाले आहेत. वाहतूक अधिक सुरळीत झाली आहे.
‘ट्रॅक्शन’ मोटरमध्ये तापमान सेन्सरचे स्थान बदलण्यात आले आहे. पूर्वी तो ‘स्टेटर बॉडी’वर होता. आता तो ‘ड्रायव्हिंग एंड’ शील्डवर बसवला आहे. यामुळे ‘बेअरिंग’चे तापमान वाढताच लवकर माहिती मिळते. संभाव्य बिघाडाची पूर्वसूचना चालकाला वेळेत मिळते. डिसेंबर २०२५ पासून या प्रणालीची चाचणी सुरू असून सर्व ट्रॅक्शन मोटर्सचे एकत्र निरीक्षण शक्य झाले आहे. यामुळे मोठे बिघाड टाळणे सोपे झाले आहे.
इंजिन चालकाच्या सोयीसाठी एर्गोनॉमिक डिझाईनच्या आधुनिक खुर्च्या बसवण्यात आल्या आहेत. या खुर्च्यांना ३६० अंश फिरण्याची क्षमता आहे. उंची समायोजन, फोल्डेबल आर्मरेस्ट आणि हेडरेस्टची सुविधा आहे. सुधारित सस्पेंशन आणि आरामदायक कुशनिंगमुळे दीर्घ वेळ काम करताना थकवा कमी होतो. आतापर्यंत २०८ खुर्च्या आठ तीन-फेज इंजिनमध्ये बसवण्यात आल्या आहेत.
रेल्वेने यापूर्वीही लोको पायलटसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. देशभरातील हजारो इंजिनच्या कॅबिनमध्ये वातानुकूलन यंत्रणा बसवण्यात आली. काही इंजिनमध्ये शौचालयांची सुविधाही देण्यात आली. तसेच धुक्यातील सुरक्षिततेसाठी हजारो ‘फॉग सेफ्टी डिव्हाईस’ बसवण्यात आले. या उपाययोजनांमुळे प्रवास अधिक सुरक्षित झाला आहे. प्रवासी आणि मालवाहतुकीची जबाबदारी इंजिन चालकावर असते. त्यामुळे त्यांच्या कामाच्या सुविधा आणि सुरक्षिततेवर रेल्वे प्रशासन सातत्याने भर देत आहे, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल म्हणाले.
