नागपूर: फेब्रुवारी महिन्यात नागपूरकडे होणारी वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने ‘टाईम टेबल ऑन डिमांड’ (टीओडी) योजनेअंतर्गत एकूण १२ विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)-नागपूर, पुणे-नागपूर तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)-नागपूर या मार्गांवर धावणार आहेत. या सेवांमुळे सणासुदीच्या तसेच अचानक वाढणाऱ्या प्रवासी गर्दीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

एलटीटी-नागपूर-एलटीटी या मार्गावर विशेष गाडी क्रमांक ०१०२१/०१०२२ अशा एकूण चार फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०१०२१ लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी पहाटे १२.५५ वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी ३.४५ वाजता नागपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१०२२ नागपूर येथून १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता एलटीटीला पोहोचेल.

या विशेष गाडीत एलएचबी डब्यांची रचना असून त्यामध्ये १ एसी द्वितीय श्रेणी, ६ एसी तृतीय श्रेणी, ९ स्लीपर, ४ सर्वसाधारण द्वितीय श्रेणी डबे, एक सर्वसाधारण द्वितीय श्रेणी-कम-गार्ड ब्रेक व्हॅन तसेच १ जनरेटर व्हॅनचा समावेश असेल. प्रवाशांच्या सुरक्षिततेसह आरामदायी प्रवासाला प्राधान्य देण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

याशिवाय पुणे-नागपूर-पुणे या मार्गावरही विशेष गाड्या धावणार आहेत. गाडी क्रमांक ०१४६७/०१४६८ या एकूण चार फेऱ्यांमध्ये चालवण्यात येतील. गाडी क्रमांक ०१४६७ पुण्याहून १३ आणि २० फेब्रुवारी रोजी दुपारी ३.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०१४६८ नागपूरहून १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता सुटून रात्री ११.३० वाजता पुण्याला पोहोचेल.

या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण १० फेब्रुवारीपासून सर्व आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर खुले करण्यात येणार आहे. प्रवाशांनी या अतिरिक्त रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.