नागपूर : रेल्वे ट्रॅकचे अपग्रेडेशन आणि नवतंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वे इंजिनची बांधणी झाली असताना रेल्वे गाड्यांची गती वाढणे अपेक्षित आहे परंतु मध्य रेल्वेने येत्या एप्रिल महिन्यापासून नागपूर-पुणे दरम्यान धावणाऱ्या गाड्या आणि नागपूर- मुंबई दरम्यान धावणाऱ्या गाड्यांना दहा ते पंधरा मिनिट उशिराने सोडण्याचा निर्णय घेतला आहे

मुंबई-नागपूर-मुंबई मार्गावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या दुरांतो एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात एप्रिलपासून बदल करण्यात येणार आहेत. कार्यान्वयन कारणांमुळे करण्यात येणाऱ्या या सुधारणांमुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे १५ मिनिटांची वाढ होणार आहे. सध्या सुमारे ८०० किलोमीटरचे अंतर ११ तास ३५ मिनिटांत पार करणारी ही गाडी एप्रिलपासून सुमारे ११ तास ५० मिनिटे घेईल.

हे नवे वेळापत्रक १४ एप्रिलपासून लागू होणार आहे. सध्या ट्रेन क्रमांक १२२८९ सीएसएमटी–नागपूर दुरांतो एक्स्प्रेस सीएसएमटीहून रात्री ७.५५ वाजता सुटते. ही वेळ सुधारून रात्री ८.३५ वाजता करण्यात आली आहे. त्यानुसार, नागपूरला सध्या सकाळी ८.०५ वाजता पोहोचणारी गाडी आता सकाळी ७.५० वाजता पोहोचेल. म्हणजेच, दुरांतो एक्स्प्रेसचा वेग प्रत्यक्षात १५ मिनिटांनी वाढवण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे, नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसची सुटण्याची वेळही बदलण्यात आली आहे. सध्या रात्री ८.३० वाजता सुटणारी ही गाडी आता रात्री ७.५५ वाजता रवाना होईल. परिणामी, मुंबईत पोहोचण्याची वेळ सकाळी ७.२० ऐवजी ८.२० अशी होणार आहे. नागपूरहून मुंबईकडे विशेषतः राज्य राजधानीकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा बदल गैरसोयीचा ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. रेल्वे प्रशासनाने दुरांतोची वेळ अर्ध्या तासाने पुढे आणण्याचा निर्णय अनावश्यक असल्याचे मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केले आहे.

विदर्भ एक्स्प्रेसचे वेळापत्रकही बदलणार

रेल्वे प्रशासनाने १२१०५ गोंदिया-नागपूर-सीएसएमटी विदर्भ एक्स्प्रेसच्या वेळेतही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बडनेरा स्थानकावर ही गाडी सध्या सकाळी ६.०० वाजता पोहोचते. नव्या वेळापत्रकानुसार ही वेळ सकाळी ६.०५ अशी करण्यात आली आहे.

गरिब रथ आणि पुणे-नागपूर गाडी उशिरा

दरम्यान, मध्य रेल्वेने पुणे-नागपूर गरिब रथ तसेच पुणे-नागपूर एक्स्प्रेसच्या वेळेतही बदल जाहीर केला आहे. आठवड्यातून तीन वेळा धावणाऱ्या या दोन्ही गाड्या सध्या नागपूरला सकाळी ९.१० वाजता पोहोचतात. नव्या वेळापत्रकानुसार या गाड्या आता सकाळी ९.२० वाजता नागपूरला पोहोचतील. हे बदल १५ एप्रिलपासून लागू होतील.