वर्धा : El Nino ही बाब सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. एल निनो ही एक नैसर्गिक हवामान विषयक स्थिती असून त्याचा संपूर्ण जगाच्या हवामानावर आणि पावसावर मोठा परिणाम होतो. सोप्या भाषेत सांगायचे तर प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा अधिक उष्ण होणे. एल निनो या शब्दाचा अर्थ लहान मूल किंवा बाल येशू असा होतो. पेरू देशातील कोळ्यांना समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढल्याची जाणीव साधारणपणे नाताळच्या सुमारास व्हायची. म्हणून हे नाव.

सुपर एल निनो

प्रशांत महासागरात या शतकातील सर्वात भयंकर ‘सुपर एल-निनो’ तयार होत असल्याचा इशारा ‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर फोरकास्टस’ने दिला आहे. तापमान सामान्यापेक्षा तीन ते चार डिग्री सेल्सिअसने वाढून भारतात भीषण दुष्काळ व तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. यामुळे मान्सून ४०% पर्यंत घटू शकतो. १९९७-९८ व २०१५-१६ मधील एल-निनोपेक्षा हा अधिक तीव्र असण्याचा अंदाज आहे. जागतिक अन्नसुरक्षा धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतीसोबतच वीजनिर्मितीवरही परिणाम होणार आहे. जलविद्युत प्रकल्पातील उत्पादन घटेल. पिण्याच्या पाण्याची टंचाई शहरातही जाणवेल. बाजारात धान्याचे दर वाढून महागाईचा भडका उडू शकतो.

अभ्यासक म्हणतात की

एल-निनो ही नैसर्गिक घटना असली तरी वातावरण बदलामुळे ती रौद्ररूप धारण करत आहे. याचा सर्वात मोठा फटका विदर्भातील कोरडवाहू शेतीला बसेल. शासनाने तातडीने जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत. मात्र प्रत्येक संकटात संधी असते. कमी पाण्यातील पिके व ठिबक सिंचनाचा प्रसार करण्याची हीच वेळ आहे असे मत पर्यावरण अभ्यासक अरुण म. कहारे हे मांडतात.

अग्नीतत्वाचा होणार प्रकोप

ग्रहमानानुसार २०२६ हे वर्ष सूर्याच्या प्रभावाखाली आहे. त्यामुळे उष्णता व अग्नितत्त्वाचा प्रकोप जाणवेल. शेतकऱ्यांनी श्रावण महिन्यातील पिके टाळावीत. सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे. निसर्ग सांगतो की आपण त्याच्याशी जुळवून घ्या. असे ग्रहतारे तज्ञ पवन शिरभाते अभ्यासक म्हणतात. १९९७-९८ च्या एल-निनोमध्ये कापसाचे उत्पादन ५०% घटले होते. धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होईल. सिंचनाचे नियोजन कोलमडू शकते. पाणी कपातीची वेळ येईल.

विज्ञाननिष्ठ होण्याची संधी

सकारात्मक बाजू अशी की आपण पाण्याचे योग्य ऑडिट करायला शिकू. जलयुक्त शिवार कामांची उपयुक्तता आता कळेल. उष्णतेमुळे शाळांचे वेळापत्रक बदलावे लागेल. सुपर एल-निनो हा केवळ हवामानाचा बदल नसून तो आर्थिक व सामाजिक व्यवस्थेवर परिणाम करणारा घटक आहे. मागील अनुभव पाहता यावेळी त्याची तीव्रता अधिक असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडू शकते.

विशेषतः विदर्भातील संत्रा व कापूस पट्ट्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने हवामानाचा अचूक अंदाज घेऊन पीक नियोजन करू शकतो. ड्रोन व एआय आधारित शेतीला प्रोत्साहन देण्याची हीच योग्य वेळ आहे. युवकांनी कृषी उद्योजकतेकडे वळावे. पाणी पुनर्वापर व रेन वॉटर हार्वेस्टिंग घराघरात व्हावे. शाळा व महाविद्यालयांनी ‘क्लायमेट लिटरसी’ मोहीम राबवावी. आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावात युवकांचे पथक तयार करावे. हा इशारा आपल्याला अधिक शिस्तबद्ध व विज्ञाननिष्ठ होण्याची संधी देत आहे.

केंद्र व राज्याची संयुक्त मोहीम

सुपर एल-निनो हा केवळ हवामानाचा इशारा नसून मानवी बेफिकिरीला निसर्गाने दिलेली धोक्याची घंटा आहे. २०१५-१६ मध्ये आपण याचा अनुभव घेतला, तरीही आपण बोध घेतला नाही. यावेळी त्याची तीव्रता तिप्पट असण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा व खान्देशात दुष्काळाची स्थिती गंभीर होईल. केंद्र व राज्य सरकारने संयुक्त ‘एल-निनो टास्क फोर्स’ स्थापन करावा. ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत जलआपत्कालीन आराखडा तयार हवा. पण निराश होऊ नका. जलसंधारण, वृक्षारोपण व शिस्तीच्या वापराने या संकटावर मात करू. शेवटी सरकार हे लोकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी काही सकारात्मक पाऊल उचलणे ही आता काळाची गरज बनली आहे, असे खगोल अभ्यासक अविनाश टाके म्हणतात.