भारतात प्रत्येक एक हजार मुलांपैकी तिघांना सेरेब्रल पाल्सी असल्याचे आढळते. महाराष्ट्रात हे प्रमाण जास्त असून सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या अभ्यासात ३२३ मुलांपैकी एकात हा आजार आढळतो. नागपूरला ३० खासगी उपचार केंद्र व शासकीय रुग्णालयांत प्रत्येक महिन्यांत येणाऱ्या नवीन रुग्णांची संख्या बघता राज्याच्या तुलनेत नागपूरला जास्त रुग्ण आढळत असल्याचे दिसत आहे.

घरात नवीन मूल जन्माला येणार अशी गोड बातमी कळली तर संपूर्ण कुटुंब आनंदून जाते. मूल गुटगुटीत व सुदृढ असावे म्हणून त्या आईची योग्य ती काळजी घेतली जाते. घरोघरी या मुलाची वाढ चांगली व्हावी म्हणून त्याची विशिष्ट काळजीही घेतली जाते. परंतु दुर्दैवाने काही प्रकरणात बाळाच्या अपरिपक्व मेंदूला जर जन्मापूर्वी, जन्माच्या वेळी किंवा जन्मानंतर काही इजा झाली तर या मुलाला सेरेब्रल पाल्सी होऊ शकते. या मुलाची बौद्धिक वाढ योग्यरित्या होत नाही. तेव्हा अशा मुलाला स्वतचीही कामेही करताना अडचणी येतात. सेरेब्रल पाल्सी ही मेंदूची स्थिती असून तो आजार नसल्याचा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा दावा आहे. देशात जवळपास २५ लाखजणांना सेरेब्रल पाल्सी आहे. गेल्या वीस वर्षांत सेरेब्रल पाल्सीचे रुग्ण कमी झालेले नाहीत. या मुलांवर लवकर उपचार देणे गरजेचे आहे. बालवयात मेंदूची लवचिकता किंवा शिकण्याची क्षमता फार चांगली असल्यामुळे त्याचा फायदा होतो.

या उपचार पद्धतीचे उद्दिष्ट हे बहुविकलांग मुलांना स्वावलंबी बनविणे आहे. उपचार करण्याकरिता या मुलांमधील शारीरिक कमतरता आणि सकारात्मक शक्ती यांचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. बालरोग तज्ज्ञ, मेंदूरोगतज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, भौतिकोपचार व व्यवसायोपचार तज्ज्ञ, स्पीच थेरपीस्ट, मानसोपचार तज्ज्ञांच्या पथकाने एकत्र काम केल्यास या मुलाला उपचाराचा लाभ होतो.

या मुलावर उपचाराकरिता न्यूरो डेव्हलपमेंट थेरपी, संवेदनाचे एकत्रीकरण, भौतिकोपचार, व्यवसायोपचार, स्पीच थेरपी, आधार साधनांचा वापर, बोटॉक्स अ‍ॅन्ड सर्जिकल अ‍ॅन्ड ओरल मेडिटेशन, औषधी, घोडय़ाच्या पाठीवरचे व्यायाम, हायपर बेरीक, ऑक्सिजन थेरपी, न्यूरो डेव्हलपमेंटल आणि सेन्सरी इन्टिग्रेशन प्रभावीपणे वापरण्यात येतात. उपचारादरम्यान मुलांसह पालकांचाही उस्फूर्त सहभाग महत्त्वाचा आसतो. मुलांच्या स्थूल आणि सूक्ष्मकारक क्षमता, संवेदना, बोधात्मक क्षमता यांचा विचार करून उपचार निश्चित केले जातात. बऱ्याच वेळा मुलांच्या कडक स्नायूंना बोटाक्स इंजेक्शन देऊन शिथिल केले जाते. त्यानंतर मुलांच्या स्नायूंमध्ये नियंत्रण आणि ताकद आणण्याचे काम विशिष्ट व्यायामाच्या मदतीने केले जाते. शहरात सध्या ३० खासगी केंद्रांसह महापालिका व मेडिकल, मेयोतील केंद्रात प्रत्येक महिन्याला ४०० ते ५०० नवीन या संवर्गातील मुले उपचाराकरिता येतात.

आज जागतिक ‘सेरेब्रल पाल्सी’ दिन

  • सेरेब्रल पाल्सी’ची कारणे
  • प्रसुतीपर्यंत गर्भधारणेच्या कालावधीत आईला संसर्ग झाल्यास
  • गर्भधारणेच्या वेळी महिलेला रक्तदाब, मधुमेह मोठा त्रास झाल्यास
  • आईला श्वास, हृदयरोग किंवा थायरॉईड ग्रंथीचा त्रास असल्यास
  • प्रसुतीच्या वेळी वा त्यापूर्वी बाळाच्या गळ्याभोवती नाळ अडकणे
  • खूप कमी वजनाचे बाळ
  • जन्मानंतर लगेच बाळाला काही संसर्ग होणे
  • बाळाच्या डोक्याला मार लागणे, कावीळ असणे
  • रक्तातील साखर कमी होणे वा काही कारणाने आकडी (फिट्स) येणे

आजार नाही मेंदूची स्थिती

सेरेब्रल पाल्सी ही मेंदूची स्थिती असून आजार नाही. पालकांनी या मुलांना स्वीकारत त्यांच्या विकासाकरिता मेहनत घेण्याची गरज आहे. भारतात अपंगत्वाचे प्रमाण हे ३.८ टक्के असून त्यातील सेरेब्रल पाल्सीचे प्रमाण १५ ते २० टक्के आहे. व्यवसायोपचार व भौतिकोपचार तज्ज्ञ या मुलांसाठी कठीण हालचाली सोप्या करून शिकवतात. या मुलांमध्ये आनंद, उत्साह, आत्मविश्वास भरण्याचे काम ते करतात. या आजाराच्या प्रत्येक मुलावर विशेष लक्ष देण्यासह गर्भवतीकडे विशेष लक्ष दिल्यास या आजारावर नियंत्रण शक्य आहे. -डॉ. मीनाक्षी वानखेड पेडियाट्रिक फिजीओथेरपिस्ट, संकल्प पेडियाट्रिक रिहॅब सेंटर, नागपूर.