अकोला : अकोला महापालिकेला चार वर्षांनंतर नवे कारभारी मिळणार आहेत. भाजपच्या नेतृत्वात ४४ नगरसेवकांचा शहर सुधार आघाडी नावाने गट स्थापन आहे. भाजपला दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाची साथ मिळाली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी अद्यापही प्रयत्न सोडले नाहीत. सत्ता समीकरण जुळवण्यासाठी विरोधी नगरसेवकांमध्ये गुरुवारी दुपारी ‘चाय पे चर्चा’ झाली. भाजपविरोधात लढा देण्याची त्यांनी तयारी दर्शवली. भाजपच्या शहर सुधार आघाडी गटाकडे बहुमत असल्याने निवडीची केवळ औपचारीकता की ऐनवेळी काही उलटफेर होणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अकोला महापालिकेची निवडणूक अटीतटीची झाली. अकोलेकरांनी कुठल्याही एका पक्षाला बहुमत दिले नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेची उत्सुकता लागली होती. महापौर व उपमहापौरांची निवड करण्यासाठी शुक्रवार, ३० जानेवारीला महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. महापौर पदासाठी तीन उमेदवारांनी एकूण पाच नामनिर्देशन पत्रे दाखल केली, तर उपमहापौर पदासाठी चार उमेदवारांनी एकूण पाच नामनिर्देशन पत्रे दाखल आहेत. या दोन्ही पदाच्या निवडणुकीपूर्वी माघार घेण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे. सत्ता समीकरण जुळवण्यासाठी ८० पैकी ४१ नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज राहील.
भाजप सर्वात मोठा पक्ष असून त्यांचे ३८ नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महानगर विकास समिती प्रत्येकी एक धरून ८० पैकी ४० जागा युतीच्या निवडून आल्या आहेत. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी, ‘एआयएमआयएम’, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना शिंदे गट व अपक्ष यांचे देखील एकूण ४० नगरसेवक विजयी झाले. बहुमताचा भाजपला सुरुवातीपासूनच विश्वास होता.
दुसरीकडे भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी इतर पक्षांसोबत बोलणी करून समीकरण जुळवण्याची काँग्रेसने धडपड केली. सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजपला रोखण्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मोट बांधली. मात्र, भाजपने शहर सुधार आघाडी नावाने ४४ नगरसेवकांचा गट स्थापन स्थापन करून विरोधकांचे प्रयत्न उधळून लावले. आघाडीकडे ४४ नगरसेवकांचे बहुमत आहे. विरोधकांनी भाजपला रोखण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. शासकीय विश्रामगृहावर आज दुपारी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, वंचित व ‘एआयएमआयएम’ च्या नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी भाजपला लढत देण्याचा निर्णय घेण्यात आला. आमच्याकडे ४१ नगरसेवक असून आमचाच महापौर बनेल, असा दावा आमदार साजिद खान पठाण यांनी केला आहे.
भाजप व शिवसेना ठाकरे गटात महापौर पदाची लढत
भाजपकडून महापौर पदासाठी शारदा खेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल आहे. त्यांच्यासोबत डमी उमेदवार म्हणून कल्पना गोटफोडे यांचा अर्ज सादर केला. महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सुरेखा मंगेश काळे यांनी महापौर पदासाठी अर्ज केला. उपमहापौर पदासाठी भाजपकडून अनिल गोगे यांनी उमेदवारी दाखल केली, तर काँग्रेसकडून आझाद खान अलीयार खान यांनी व अपक्ष म्हणून नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी देखील अर्ज भरला आहे.
संख्याबळ
भाजप : ३८
काँग्रेस : २१
शिवसेना ठाकरे गट : ०६
शिवसेना शिंदे गट : ०१
राष्ट्रवादी अजित पवार गट : ०१
राष्ट्रवादी शरद पवार गट : ०३
वंचित आघाडी : ०५
एआयएमआयएम : ०३
महानगर विकास समिती : १
अपक्ष : ०१ एकूण जागा : ८०

