सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पासमोर आव्हानेच अधिक

बारा वाघांची क्षमता असूनही स्थिरावण्याचे प्रमाण शून्य

बारा वाघांची क्षमता असूनही स्थिरावण्याचे प्रमाण शून्य
नागपूर : पश्चिम घाटातील सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पात बारा वाघ सामावून घेण्याची क्षमता असतानाही या व्याघ्र प्रकल्पात गेल्या दहा वर्षांत वाघ स्थिरावू शकले नाहीत. विदर्भातील पाच व्याघ्र प्रकल्पांच्या तुलनेत या व्याघ्र प्रकल्पासमोर नैसर्गिक आव्हानांसोबतच व्यवस्थापनाचे मोठे आव्हान आहे.

एकीकडे नवेगाव-नागझिरासारख्या ६५० चौरस किलोमीटर व्याघ्र प्रकल्पात कायमस्वरूपी अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या चारशे तर विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे जवान मिळून सुमारे २४३ च्या जवळपास वनरक्षक आहेत. मात्र, त्याच वेळी ११६५ चौरस  किलोमीटरच्या सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पात कायमस्वरूपी अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे १५३ तर गस्तीसाठी लागणाऱ्या वनरक्षकांची संख्या के वळ ५६ आहे. एकही किलोमीटरचा रस्ता नसलेल्या या परिसरात जाण्यासाठी अलीकडच्या दोन वर्षांत ४० किलोमीटरचे रस्ते कडय़ांवरून तयार करण्यात आले. चांदोलीतील नादुरुस्त रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. सुमारे ४३ संरक्षण कु टी तयार करण्यात आल्या. गेल्या दहा वर्षांत या सुविधा होणे अपेक्षित असताना अलीकडे त्याकडे लक्ष दिले जात आहे. पुनर्वसनाचे सर्वात मोठे आव्हान या व्याघ्र प्रकल्पासमोर आहे. २९ गावांचे पुनर्वसन झाले असले तरीही पुनर्वसनाबाबत तक्रोरींचा ओघ कायम आहे. अलीकडेच पार पडलेल्या जागतिक व्याघ्र दिनाच्या कार्यक्र मातून सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पासमोरील आव्हाने समोर आली आहेत.

दीर्घकालीन धोरण

सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पात वाघ परत आणण्याच्या दृष्टीने भारतीय वन्यजीव संस्था, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि महाराष्ट्र वन विभागाच्या वतीने दीर्घकालीन धोरण राबवण्यात येत आहे. व्याघ्र अधिवास आणि व्याघ्रवृद्धीच्या दृष्टीने मूल्यांकन करण्यात येत आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या सभोवताली सात संवर्धन राखीव घोषित के ल्यास अधिवासाची संलग्नता वाढवता येऊ शकते, हे या दरम्यान लक्षात आले आहे. तृणभक्ष्यी प्राण्यांच्या स्थानांतरणासाठी संभाव्य क्षेत्र ओळखून झोलंबी येथे २० चितळ आणि ३० सांबर यांच्या स्थानांतरणाचा प्रस्ताव आहे.

पाऊस अडचण..

सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पाच्या एका बाजूला कोयना धरण तर दुसऱ्या बाजूने कोकण कडा आहेत. या दोन्हीच्या मध्ये जंगल आहे. सलग दोन वर्षे या ठिकाणी चेरापुंजीपेक्षाही अधिक पाऊस कोसळला. या वर्षी जुलै महिन्यात अवघ्या पाच दिवसांत साडेतीन हजार मिलीमीटर पाऊस पडला. त्यामुळे या वर्षीही तीच शक्यता आहे. पावसाळ्यात जोरदार नाले वाहत असल्याने गस्त शक्य होत नाही. व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात पावसाळ्यात एकही व्यक्ती जाऊ शकणार नाही इतका पाऊस आहे. त्यामुळे बोटींनी वनरक्षकांना आत सोडले तरी त्यांना बाहेर आणायचे असेल अथवा त्यांच्या कक्षात फिरायचे असेल तर डोंगर चढून जावे लागते. त्यामुळे अलीकडेच एक व्यक्तीसाठी असणारी बोट त्यांना देण्यात आली आहे. या बोटीच्या साहाय्याने ते धरणाच्या काठावरील संरक्षण कु टीत जातात.

नेमके होते काय?

कोयना आणि चांदोली या दोन अभयारण्यांच्या सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पात समावेश आहे. या व्याघ्र प्रकल्पात वाघ स्थिरावण्याऐवजी चांदोली अभयारण्यातून वाघ येतात आणि एक-दोन महिन्याच्या मुक्कामानंतर परत जातात. वाघ या ठिकाणी स्थिरावण्यासाठी त्यावर देखरेख आवश्यक असताना नैसर्गिक संरचना आणि अपुऱ्या मनुष्यबळाअभावी ते शक्य होत नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Challenge more before the sahyadri tiger project in western ghats zws

ताज्या बातम्या