मराठा समाजाला ‘ईडब्ल्यूएस’मध्ये जागा देण्याला आव्हान

राज्य सरकारला नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात आलेले एसईबीसी आरक्षण रद्द ठरवल्यानंतर राज्य सरकारने या समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गात (ईडब्ल्यूएस) सामावून घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले. न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अनिल किलोर यांनी राज्य सरकारला नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

शुभम दिनेशचंद्र मिश्रा आणि इतरांनी ही याचिका दाखल केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) स्थापत्य अभियंता पदाची भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून सध्या मुलाखती सुरू आहेत. दरम्यान, राज्य सरकारने मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गांतर्गत १६ टक्के आरक्षण जाहीर केले होते. ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवले. त्यामुळे स्थापत्य अभियंता पदभरतीमध्ये मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण रद्द करून त्या प्रवर्गांतर्गत अर्ज भरलेल्या उमेदवारांना त्यांची मूळ जात व प्रवर्गातून विचारात घ्यायला हवे होते. पण राज्य सरकारने मराठा समाजातील उमेदवारांना आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गात सामावून घेण्याचा निर्णय घेतला. एखादी भरती प्रक्रिया सुरू असताना व ती अंतिम टप्प्यात असताना आरक्षणातील फेरबदल हे, मागास प्रवर्गातील मूळ अर्जदारांवर अन्याय आहे, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. तसेच एसईबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांबाबत त्यांच्या मूळ जात व प्रवर्गातून विचार करण्यात यावा. त्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्गात सामावून घेऊ नये, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली. याचिकाकर्त्यांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकार आणि एमपीएससीला नोटीस बजावून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Challenge to give place to maratha community in ews akp

Next Story
प्रशासनाची कुंभकर्णी झोप कधी संपणार?
ताज्या बातम्या