गडचिरोली : शेतात गेलेली ६० वर्षीय महिला सायंकाळपर्यंत घरी परतली नाही. शोध घेतल्यानंतर तिचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. घटनास्थळी ठोस पुरावा नसल्याने खुनाचा तपास पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरला. मात्र, मृतदेहावरील जखमांचे बारकाईने निरीक्षण करताना पोलिसांना एक महत्त्वाचा धागा मिळाला. जखमांच्या स्वरूपावरून मारेकरी डावखुरा असावा, असा अंदाज बांधत तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. अखेर तांत्रिक पुरावे, कौटुंबिक संबंधांची पडताळणी आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताला गाठले. जुन्या वादातून काठीने मारहाण करून त्यानंतर दगडाने ठेचून महिलेचा खून केल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना चामोर्शी तालुक्यातील नारायणपूर चक क्रमांक दोन येथे ५ सप्टेंबर रोजी घडली. गोपीकाबाई रामचंद्र गायकवाड (६०) या शेतात गेल्या होत्या. मात्र, संध्याकाळ झाली तरी त्या घरी परतल्या नाहीत. त्यामुळे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी शेत परिसरात शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी चामोर्शी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग देण्यात आला. सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली पोमकें घोट आणि स्थानिक गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली.
पुरावा नसतानाही जखमांवरून धागा
तपासाच्या सुरुवातीला पोलिसांच्या हाती आरोपीविरोधात ठोस पुरावा नव्हता. अशा परिस्थितीत सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांनी मृतदेहावरील जखमांचे बारकाईने निरीक्षण केले. जखमांची दिशा आणि स्वरूप लक्षात घेता हल्लेखोर डावखुरा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या निरीक्षणामुळे तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी मयत महिलेचे कौटुंबिक संबंध, पूर्वीचे वाद, परिसरातील संशयित व्यक्ती आणि उपलब्ध तांत्रिक पुरावे तपासण्यास सुरुवात केली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांचा संशय नारायणपूर चक क्रमांक दोन येथील संदीप रावजी टेकाम (३५) याच्यावर बळावला. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता जुन्या वैमनस्यातून गोपीकाबाई यांच्यावर काठीने हल्ला केल्याचे आणि त्यानंतर दगडाने ठेचून त्यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
संदीप टेकाम याला २९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. त्याला चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे करीत आहेत.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, सहायक पोलीस निरीक्षक भगतसिंग दुलत, आगलावे, पोमकें घोटचे सहायक पोलीस निरीक्षक कल्पेश खारोडे, रेगडीचे सहायक पोलीस निरीक्षक गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विश्वा कराळे तसेच अन्य अधिकारी आणि अंमलदार सहभागी होते. या पथकाच्या कामगिरीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी कौतुक केले.
