लोकसत्ता टीम Monsoon Update Maharashtra - नागपूर : भारतीय हवामान खात्याने राज्यातील बहुतांश भागात पाऊस ओसरणार असे सांगितले असले तरी कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात मात्र अजूनही पावसाच्या सरी कोसळत आहेत. राज्यात पाऊस ओसरला असला, तरी घाटमाथ्यासह तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळत आहेत. मागील आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला. आता पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे बळीराजाने शेतीकामांना वेग दिलाय. अशातच हवामान खात्याने आज पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातून पावसाने काही प्रमाणात विश्रांतीची वाट धरल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्रासह मुंबई शहर आणि उपनगरामध्येही हीच स्थिती असताना कोकण, विदर्भ आणि राज्यातील घाटमाथ्याचा परिसर मात्र अपवाद ठरत आहे. कारण, येथून अजूनही पावसाने माघार घेतलेली नाही. आणखी वाचा-नाना पटोले ‘या’ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार… झारखंड आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीवर, तर ईशान्य राजस्थान आणि परिसरावर ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. मॉन्सूनचा आस राजस्थानच्या बिकानेर, शिवपुरी, सिधी, दौलतगंज, दिघा ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर कर्नाटकपर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. शुक्रवारी कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. तर विदर्भासह मराठवाड्यात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. बऱ्याच वर्षानंतर मोसमी पावसाला साजेसा पाऊस महाराष्ट्रात यंदा सुरू आहे. वादळीवारा, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाटासह पाऊस यावर्षी राज्यात दिसून आला नाही. आणखी वाचा-सोने दरात पुन्हा मोठे बदल, दागिने खरेदीबाबत ग्राहक चिंतेत… दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आजदेखील कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तर उर्वरित राज्यात उघडिपीसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. आज, शनिवारी कोकणातील रायगड जिल्हा, तसेच पुणे जिल्ह्याचा घाटमाथा, पूर्व विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा ‘येलो अलर्ट’ दिला आहे. सध्या विदर्भात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली असली तरीही अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी देखील कोसळत आहेत. मात्र, पूर्णपणे सुर्यनारायणाचे दर्शन अजूनही नाही. राज्यातील अनेक भागात सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाची उघडीप आहे. तर राज्यातील काही ठिकाणी अधून मधून जोरदार सरीही पडत आहेत.