चंद्रपूर: भद्रावती वनपरिक्षेत्रातील घोटनिंबाळा आणि परिसरात गेल्या महिनाभरापासून दहशत निर्माण करणारा बिबट अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला. या कारवाईमुळे घोटनिंबाळा, चालबर्डी, कचराळा, गोंड नुन्हारा, लोणारा पारखी तसेच आयुध निर्माणी चांदा परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
जनावरांवरील हल्ल्यांची नोंद
वनविभागाच्या माहितीनुसार, या बिबट्याने मागील महिनाभरात सुमारे २० कालवडी, वासरे आणि इतर पाळीव जनावरांवर हल्ले केल्याची नोंद आहे. त्यामुळे परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः घोटनिंबाळा, लोणारा पारखी, चालबर्डी, कचराळा, देऊळवाडा तसेच इंद्रप्रस्थ गार्डनमागील रामटेके सोसायटी परिसरात नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली होती.
सोमवारी अडकला पिंजऱ्यात
बिबट्याच्या वाढत्या वावराची आणि जनावरांवरील हल्ल्यांची गंभीर दखल घेत वनविभागाने घोटनिंबाळा परिसरात पिंजरा लावला होता. अखेर सोमवारी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास बिबट पिंजऱ्यात अडकला. पकडण्यात आलेला बिबट अंदाजे चार ते साडेचार वर्षांचा नर असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.
गावकऱ्यांना दिलासा
बिबट पकडल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. गेल्या काही दिवसांपासून जनावरांच्या सुरक्षेबाबत शेतकरी आणि पशुपालक चिंतेत होते. त्यामुळे वनविभागाच्या कारवाईनंतर गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ही मोहीम विभागीय वन अधिकारी राजन तलमले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. सहाय्यक वनसंरक्षक तरसे यांच्या नेतृत्वात भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे, क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे, देवगडे (चालबर्डी), तसेच पवन मांढरे, प्रफुल (टिंकू) मांढरे, राजू कुळमेथे, शैलेश कुळसंगे, अनिल शेंद्रे, किशोर मडावी आणि कपिल झाडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
वैद्यकीय तपासणी नंतर जंगलात सोडणार
सध्या या बिबट्याला आयुध निर्माणी चांदा परिसरातील वनविभागाच्या गंधा नाला नर्सरीमध्ये निरीक्षणासाठी ठेवण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार त्याला पुढील काही दिवसांत योग्य वैद्यकीय तपासणीनंतर जंगलातील सुरक्षित अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.
साधारणता चार ते पाच दिवसांपूर्वी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. पिंजऱ्यात बिबट्या अलगद जेरबंद व्हावा यासाठी कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या. पहाटे चार वाजताच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्यानंतर सकाळी गस्त घालणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे निदर्शनास आले. त्यानेच ही माहिती वन अधिकाऱ्यांना दिलीं माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले आणि जेरबंद बिबट्याचा पिंजरा तिथून वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाहनाद्वारे हलविण्यात आला.
