चंद्रपूर : विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचा आरोप असलेल्या गडचांदूर नगर पालिकेतील भाजप नगरसेवक सूरज रामभवन पांडे यांच्याविरोधात प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ५६ (१) (अ) (ब) अंतर्गत उपविभागीय दंडाधिकारी रविंद्र माने यांनी पांडे यांना तीन महिन्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे. या कारवाईमुळे राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गडचांदूर शहरातील प्रभाग क्रमांक १० चे भाजप नगरसेवक असलेल्या सूरज पांडे यांच्याविरोधात गडचांदूर पोलीस ठाण्यात दारूबंदी कायदा, मारहाण, शासकीय कामात अडथळा, अवैध सावकारी, जुगार तसेच महिलांशी छेडछाड यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या आरोपांशी संबंधित एकूण नऊ गुन्हे दाखल असल्याचे प्रशासनाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप

गोपनीय साक्षीदारांच्या जबाबांमध्ये पांडे यांनी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात भरधाव दुचाकी चालविणे, मद्य व गांजासारख्या अमली पदार्थांचे सेवन करणे तसेच अवैध व्यवसाय चालविण्याचे आरोपही त्यांच्यावर करण्यात आले आहेत. याशिवाय बेरोजगार तरुण आणि गरीब मजुरांना व्याजाने पैसे देऊन अवैध सावकारी केल्याचाही आरोप आहे. पैसे परत न केल्यास वाहन घेऊन जाणे, मारहाण करणे, महिलांशी छेडछाड करणे आणि धमकावणे, असे प्रकार केल्यामुळे नागरिक त्यांच्याविरोधात उघडपणे तक्रार करण्यास धजावत नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

राजकीय द्वेषातून कारवाईचा दावा फेटाळला

गडचांदूर पोलीस ठाणे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदूर यांच्या अहवालाच्या आधारे उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाने पांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीला उत्तर देताना पांडे यांनी आपल्याविरोधातील कारवाई ही राजकीय द्वेषातून केली जात असल्याचा दावा केला. मात्र, संबंधित जबाब, पोलीस अहवाल तसेच सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेला निर्माण होऊ शकणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन उपविभागीय दंडाधिकारी रविंद्र माने यांनी पांडे यांचा बचाव अमान्य केला. त्यानंतर त्यांना तीन महिन्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश जारी करण्यात आला.

हद्दपारीच्या काळात पोलिस ठाण्यात हजेरी बंधनकारक

हद्दपारीच्या कालावधीत सूरज पांडे ज्या ठिकाणी वास्तव्यास राहतील, त्या ठिकाणच्या जवळच्या पोलीस ठाण्यात दर महिन्याला एकदा हजेरी लावून आपल्या वास्तव्याची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच हद्दपारीची मुदत पूर्ण झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात परतल्यानंतर दहा दिवसांच्या आत स्थानिक पोलिसांना परत आल्याची माहिती देणेही अनिवार्य करण्यात आले आहे. या कारवाईमुळे गडचांदूरमधील राजकीय वातावरण तापले असून, प्रशासनाच्या या कठोर पावलाकडे शहराचे लक्ष लागले आहे.