चंद्रपूर: महापालिका निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीतील १७ एबी फॉर्म चोरी झाल्याने या सर्वांना पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवावी लागली. आता या सर्वांना पक्षात अधिकृत प्रवेश देण्याची घोषणा माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप स्थापना दिवसाचे निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केली. चंद्रपुरातील विविध पक्षांमधील एकूण १६३० कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी ‘संकल्प ते सिद्धी’ या भाजपच्या मूलमंत्राचा उलगडा करत कार्यकर्त्यांच्या बळावरच भाजपाचा वैभवशाली प्रवास झाल्याचे विचार मांडले. त्याचवेळी प्रत्येक कार्यकर्त्याने ‘राष्ट्र प्रथम’ या विचाराने कार्य करण्याचे भावनिक आवाहनही आ. मुनगंटीवार यांनी केले. गांधी चौक येथे स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला चंद्रपुरातील विविध पक्षांमधील एकूण १६३० कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यकर्त्यांशी आ. मुनगंटीवार यांनी संवाद साधला आणि २०२७ मध्ये भाजपा स्थापना दिनानिमित्त दहा हजार कार्यकर्त्यांसोबत चांदा क्लब ग्राउंड येथे भव्य कार्यक्रम घेण्याचा कार्यकर्त्यांनी संकल्प करा असा निर्धारही यावेळी व्यक्त केला.

आ. मुनगंटीवार म्हणाले, ‘भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन केवळ एक औपचारिक उत्सव नसून कार्यकर्त्यांसाठी नव्या उर्जेचा आणि संकल्पाचा दिवस आहे. ‘राष्ट्र प्रथम, मग पक्ष आणि शेवटी स्वतः’ या विचाराने काम करण्याची गरज आहे.’ यावेळी त्यांनी भाजपाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या संघर्षमय प्रवासाची आठवण करून दिली. कार्यकर्त्यांचा त्याग, त्यांची निष्ठा आणि त्यांच्या परिश्रमामुळेच आज भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष बनल्याचा अभिमानही आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा” या अटलजींच्या मंत्रापासून ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील नवभारताच्या संकल्पापर्यंतचा प्रवास म्हणजे कार्यकर्त्यांची श्रद्धा आणि त्यांच्या समर्पणाची गाथा आहे, असे सांगत त्यांनी उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजपूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विविध पक्षांमधून एकूण १६३० कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश करून त्यांचे दुपट्टा घालून स्वागत करण्यात आले. भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महापौर संगीता खांडेकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद कडू ,राजेंद्र गांधी, विजय राऊत, माजी महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, रामपाल सिंग, प्रकाश धारणे, ब्रिजभूषण पाझारे, नम्रता ठेमस्कर, रवी लोणकर,जयश्री जुमडे, सुनीता जयस्वाल, सविता सरकार,सुरज पेदूवार,चांद सैय्यद, अनिल डोंगरे, विक्की लाडसे,छबुताई वैरागडे, धनराज कोवे आदींची यावेळी उपस्थिती होती.