चंद्रपूर : महापालिका सभागृह नेतेपदाच्या निवडीवरून भाजपमध्ये आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार गटांतील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. ३२ पैकी २७ नगरसेवकांनी सभागृह नेतेपदासाठी सुचवलेल्या चंद्रशेखर शेट्टी यांच्या नावाला बगल देत महापौरांनी जयश्री जुमडे यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे भाजपच्याच नगरसेवकांनी स्वपक्षीय महापौरांचा फलकांद्वारे निषेध नोंदवला.

निषेध करणारे भाजप नगरसेवक

भाजप नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, शेखर शेट्टी, नगरसेविका सविता कांबळे, नगरसेवक संजय कंचर्लावार, सरला कुळसंगे, अनुजा तायडे, पुष्पा उराडे, नितेश गवळी, जितेश कुळमेथे, आशा देशमुख, सारिका संदुरकर, रॉबिन बिश्वास, राजलक्ष्मी कारगंल, डिलन केळझरकर, भालचंद्र दाणव, शीतल गुरुनुले, ज्योती जीवने यांनी महापौरांचा निषेध नोंदवला.

घरी जावून महापौरांवर दबाव

सर्व नगरसेवकांनी मंगळवारी महापौर खांडेकर यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. महापौरांनी बुधवारी महापालिकेत बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. ठरलेल्या वेळेनुसार सर्व नगरसेवक पालिकेत उपस्थित राहिले, मात्र महापौरच गैरहजर होत्या. दुपारी ५ वाजतापर्यंत प्रतीक्षा करूनही त्या आल्या नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी महापौरांच्या कार्यालयात ‘बेईमानी करणाऱ्या महापौर’ अशा आशयाचे फलक झळकवून निषेध नोंदविला.

महापौरांच्या भूमिकेने पक्षात फुटीचा आरोप

भाजपचे १७ नगरसेवक आणि सहयोगी पक्षांचे नगरसेवक मिळून एकूण २७ नगरसेवकांनी एकमताने शेट्टी यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यास सहमती दर्शविली होती. याबाबत शिवसेना उबाठाचे गटनेते राहुल विरुटकर यांनी ठरावही मंजूर केला होता. असे असताना महापौरांनी दुसऱ्या उमेदवाराचे नाव जाहीर करून बहुमताचा व नगरसेवकांच्या भावनांचा अनादर केला आहे, असा आरोप भाजपचे माजी महानगराध्यक्ष कासनगोट्टूवार यांनी केला. स्थायी समिती सभापतीपदासाठी महापौरांच्या गटातील दोन नावे सुचवणे, महिला व बालकल्याण समितीसाठी त्यांच्या गटाच्या नगरसेवकाला पाठिंबा देणे, अशाप्रकारे पक्ष एकजुटीचा सातत्याने प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, महापौरांच्या भूमिकेमुळे पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असून तो पक्षासाठी घातक ठरू शकतो, असेही कासनगोट्टूवार यांनी नमूद केले.

या प्रकरणामुळे महापालिकेतील राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजप पक्षश्रेष्ठी यावर काय तोडगा काढतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.