चंद्रपूर : उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे चंद्रपूर जिल्हा अक्षरशः होरपळून निघत असून शुक्रवारी ब्रह्मपुरी येथे यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी ४७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर चंद्रपूर शहरात ४६.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे झाली असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे ब्रह्मपुरीत गुरूवारी ४७.१ तर चंद्रपूर शहरात ४६,८ अंश डिग्री सेल्सीअस तापमानाची नोंद घेण्यात आली होती.
आज उच्चांकी तापमानाची नोंद
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच यंदाच्या उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली होती. एप्रिलमध्ये वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेच्या लाटेने अधिक तीव्र रूप धारण केले असून मागील २० दिवसांपासून चंद्रपूरचे तापमान सातत्याने ४४ ते ४५ अंशांच्या दरम्यान राहिले आहे. शुक्रवारी मात्र तापमानाने उच्चांक गाठला. ब्रह्मपुरी येथे ४७.२ अंश तापमानाची नोंद झाली, तर चंद्रपूर शहराचे तापमान ४६.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
रस्ते निर्मनुष्य, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट
प्रखर उन्हामुळे दुपारच्या सुमारास दोन्ही शहरांतील रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुख्य बाजारपेठांमध्येही शुकशुकाट दिसून आला. उष्माघाताचा धोका वाढल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली असून ग्रामीण भागातील नागरिकांनाही त्याचा फटका बसू लागला आहे. हवामान विभागाने २२ ते २४ मे पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट राहणार असा इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवस चंद्रपुरकरांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागणार आहे. तेव्हा लोकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
२५ मे ते २ जूनदरम्यान नवतपा
चंद्रपूर शहरातील तापमान हे सातत्याने अधिक राहत आहे, त्यातच मे महिन्यात नवतपा येतो. यंदा २०२६ मध्ये हा कालावधी २५ मे ते २ जून या दरम्यान असण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता असुन अश्या वातावरणात आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात विशेषतः नवतपा सुरू असताना नऊ दिवस पृथ्वी सूर्याच्या अगदी जवळ असते व उष्णतेचा पारा सर्वाधिक असतो.त्यामुळे उष्णतेपासुन संरक्षण करण्यास प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जनजागृती आरोग्य विभागातर्फे करण्यात येते. यंदा मान्सुनच्या लवकर आगमनाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे मात्र कडक उन्हाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने विशेष काळजी घेणे योग्य राहते.
