चंद्रपूर : महापालिकेत सत्तास्थापनेवरून काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. दोन्ही नेत्यांना स्वत:च्या गटाचा महापौर व गटनेता हवा आहे. वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात मनोमिलन व्हावे, यासाठी काँग्रेसच्या प्रदेश व केंद्रीय नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्यासाठी सातत्याने बैठका होत आहे. मात्र, समाधानकारक तोडगा अद्याप निघालेला नाही. यामुळे दोन्ही गटांचे नगरसेवकही आता वैतागले आहेत.

महापालिका निवडणुकीचा निकाल लागून आज १६ दिवस उलटले, तरी वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील संघर्ष कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. दोन दिवसांपूर्वी वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. या अपहरणनाट्याची पक्षपातळीवर तसेच इतर सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्याचा फटका धानोरकर गटाला बसला आहे. यात काँग्रेसचीही बदनामी होत आहे. तरीही दोन्ही नेते एकत्र येण्यास तयार नाहीत.

काँग्रेसचे एकूण २७ नगरसेवक आहेत. सुरुवातीला धानोरकर गटाकडे १३, तर वडेट्टीवार गटाकडे १४ नगरसेवक होते. प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश निरीक्षक कुणाल चौधरी यांच्यासोबत वडेट्टीवार व धानोरकर यांची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत गटनेता प्रदेशाध्यक्षांचा, महापौर धानोरकर यांचा, तर स्थायी समिती अध्यक्ष वडेट्टीवार यांचा असेल, असे ठरले होते. वडेट्टीवार यांनी यास होकार दर्शविला. महापौरपदासाठी संख्याबळ जुळविण्याची सर्वस्वी जबाबदारी धानोरकर यांची राहील, अशी अटही त्यांनी ठेवली. मात्र, त्यानंतर लगेच वडेट्टीवार यांनी भूमिका बदलली आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्याशी सत्तास्थापनेबाबत चर्चा केली. दरम्यानच्या काळात वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांची संख्या २०पर्यंत पोहोचली. सर्वाधिक नगरसेवक असल्याने गटनेता व महापौरपदासाठी वडेट्टीवार यांनी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला आहे.

पुन्हा प्रदेश प्रभारींची मध्यस्थी?

वडेट्टीवार व धानोरकर या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळ, माजी मंत्री सुनील केदार, केंद्रीय निरीक्षक चौधरी यांनी नागपुरात सातत्याने बैठका घेतल्या. मात्र, सर्वांनाच अपयश आले. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रदेश प्रभारी चेन्नीथला वडेट्टीवार व धानोरकर यांच्यात मध्यस्थी करतील, अशी आशा आहे.

गटस्थापनेसाठी वडेट्टीवार यांचे प्रयत्न

काँग्रेसचे २७, जनविकास सेनेचे तीन आणि एमआयएम व बसपचा प्रत्येकी एक, असे ३२ नगरसेवकांचे संख्याबळ काँग्रेसच्या बाजूने आहे. काँग्रेसला आणखी दोन नगरसेवकांची गरज आहे. काँग्रेस बंडखोर नगरसेवक नंदू नागरकर व प्रशांत दानव यांची वडेट्टीवार यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. धानोरकर गटाचा महापौर करण्यास त्यांचा विरोध आहे. यामुळे सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ जमवण्याची जबाबदारी काँग्रेसने पुन्हा एकदा वडेट्टीवार यांच्यावर सोपवली आहे. वडेट्टीवार यांनी हीच संधी साधत संख्याबळाच्या गणितावर काँग्रेसचा गट स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे.