नागपूर : चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक १६ नगरसेवकांनी गटनेता बदलण्याच्या मागणीसाठी नागपूर विभागीय आयुक्तांची भेट घेतल्याने पक्षातील वडेट्टीवार-धानोरकर वाद नव्याने चर्चेत आला आहे.
गटनेता बदलासाठी विभागीय आयुक्तांकडे धाव
चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस गटातील बहुसंख्य नगरसेवकांनी विद्यमान गटनेता राजेश अडूर यांच्या विरोधात ठराव मंजूर केल्याचा दावा करत मंगळवारी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात धाव घेतली. धानोरकर समर्थक १६ नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करत नव्या गटनेत्याच्या निवडीसाठी हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. सुरेंद्र आडबाले यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
‘व्हीप’ उल्लंघनाचा आरोप; कारवाईची मागणी
दुसरीकडे, विद्यमान गटनेता राजेश अडूर यांनी धानोरकर समर्थक नगरसेवकांवर पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. संबंधित १६ नगरसेवकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. काँग्रेस गटातील एकूण २७ नगरसेवकांपैकी १६ नगरसेवक धानोरकर गटासोबत असून ११ नगरसेवक विजय वडेट्टीवार समर्थक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गटनेतृत्वाच्या प्रश्नावर दोन्ही गटांमध्ये संघर्ष तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.
नगरसेवकांना दबावाखाली आणल्याचा गंभीर आरोप
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राजेश अडूर यांनी काही नगरसेवकांना आर्थिक प्रलोभने देऊन आणि दबाव टाकून विभागीय आयुक्त कार्यालयात आणण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. विभागीय आयुक्तांवरही दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला. या आरोपांमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र धानोरकर समर्थकांनी हे आरोप फेटाळून लावत नगरसेवकांनी स्वेच्छेने निर्णय घेतल्याचा दावा केला आहे.
‘हा नगरसेवकांचा निर्णय’; प्रतिभा धानोरकर यांची भूमिका
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना हा संघर्ष वैयक्तिक नसल्याचे स्पष्ट केले. हा वाद माझा किंवा विजय वडेट्टीवार यांचा नाही. काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांच्या राजकीय भूमिकेनुसार निर्णय घेतला आहे, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसकडे लक्षणीय संख्याबळ असूनही पक्षाला महापौरपद मिळविता आले नव्हते. त्यावेळी पक्षातील गटबाजीचा लाभ भाजपला झाल्याची चर्चा रंगली होती. आता गटनेता बदलाच्या मागणीमुळे काँग्रेसमधील सत्तासंघर्ष पुन्हा एकदा उघड झाला असून पक्षश्रेष्ठी या वादावर कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
