नागपूर : चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस गटाच्या नोंदणीवरून निर्माण झालेला पक्षांतर्गत वाद आता राज्याच्या नगरविकास विभागाकडे पोहोचला असून, या वादावर अंतिम निर्णय येईपर्यंत काँग्रेस गट नोंदणीचा प्रश्न प्रलंबित राहणार आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या गट नोंदणीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार समर्थक नगरसेवकांनी आक्षेप घेतल्यानंतर नागपूर विभागीय आयुक्तांनी हा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठविला आहे.

चंद्रपूर महापालिकेसाठी काँग्रेसचा अधिकृत गट नोंदविण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर गेल्या शुक्रवारी नागपूर येथे दाखल झाल्या होत्या. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसारच महापालिकेतील गटनेतेपदाची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या सूचनेनुसार सुरेंद्र अडबाले यांची गटनेतेपदी निवड करण्यात आल्याचा दावा धानोरकर यांनी केला होता. नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी काँग्रेस गटाच्या नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर केली. यावेळी १३ नगरसेवकांची यादी विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्याकडे देण्यात आली.

 “प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसारच गट नोंदणी करण्यात आली आहे. पक्षाने ज्या व्यक्तीचे नाव गटनेतेपदी सुचविले, त्याच व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. नोंदणीकृत गटच अधिकृत मानला जातो.” काही नगरसेवक पक्षांतर्गत राजकारणामुळे वेगळ्या भूमिकेत गेले असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, संबंधित नगरसेवकांनी अधिकृत गटात सहभागी व्हावे, अन्यथा पक्षविरोधी कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.

दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांचे समर्थक नगरसेवक देखील विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित होते. धानोरकर गटाकडे बहुमत नसून आमच्याकडे १६ नगरसेवक आहेत, त्यामुळे त्यांच्या गटाला मान्यता देऊ नये, अशी मागणी वडेट्टीवार समर्थकांनी केली. या तक्रारीची दखल घेत विभागीय आयुक्तांनी चंद्रपूर काँग्रेसमधील गटतटाचा प्रश्न सोडविण्यासाठी संपूर्ण प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविला.

या घडामोडींमुळे चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. नगरविकास विभाग यावर काय निर्णय घेतो, यावर महापालिकेतील काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, काँग्रेसमधील या अंतर्गत वादाचा फायदा भाजपला होणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.