चंद्रपूर : काँग्रेसच्या विजयी आणि पराभूत नगरसेवकांसाठी खासदार प्रतिभा धानोरकरांनी आयोजित केलेल्या स्नेहमिलन सोहळ्याला विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या समर्थक नगरसेवकांनी दांडी मारली. यामुळे काँग्रेसमधील गटबाजी कायमच असल्याचे अधोरेखित झाले. स्नेहमिलन सोहळ्यात काहींनी आपल्या भाषणात महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीतील पराभवाचे खापर थेट नाव न घेता वडेट्टीवार यांच्यावर फोडले. या माध्यमातून गटबाजीला अप्रत्यक्षपणे खतपाणीच घालण्याचा प्रयत्न झाल्याने या सोहळ्याची चर्चा जोरात सुरू आहे.
महापालिका निवडणुकीत वडेट्टीवार व धानोरकर यांच्यातील गटबाजी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. याच गटबाजीमुळे काँग्रेसला महापालिकेत सत्ता मिळवता आली नाही. हा वाईट अनुभव विसरण्यासाठी आणि निवडून आलेल्या नगरसेवकांचा सत्कार व पराभूत उमेदवारांना बळ देण्यासाठी खासदार धानोरकर यांनी लोहारा येथे एका फार्महाऊसवर स्नेहमिलन सोहळा आयोजित केला. या सोहळ्याचे निमंत्रण काँग्रेस आणि जनविकास सेनेच्या सर्व नगरसेवक तथा पराभूत उमेदवार व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना देण्यात आले होते. मात्र, याकडे वडेट्टीवार समर्थक नगरसेवकांनी पाठ फिरवली. केवळ वसंत देशमुख आणि खंडेलवाल यांनीच हजेरी लावली. काँग्रेसचे गटनेते राजेश अडूर, सचिन कत्याल, महिला शहराध्यक्ष चंदा वैरागडे यांच्यासह वडेट्टीवार गटाचे ९० टक्के नगरसेवक या सोहळ्याला अनुपस्थित होते. यावरून काँग्रेसमधील गटबाजी आणि मतभेद व मनभेद अद्यापही कायम असल्याचाच संदेश गेला.
खासदार धानोरकर, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंग गौर, विनोद दत्तात्रेय, प्रभारी शहराध्यक्ष संतोष लहामगे, महिला काँग्रेस अध्यक्ष कुंदा जेनेकर, वसंत देशमुख, जनविकास सेनेचे गटनेते पप्पू देशमुख मंचावर उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
धानोरकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकदिलाने काम करा, असे आवाहन केले. जनविकास सेनेचे देशमुख यांनीही खासदार धानोरकर यांना मताधिक्याने विजयी करू, असा निर्धार व्यक्त केला. दोन्ही नेत्यांनी, वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांना वेगळा निर्णय घेण्यासाठी पक्षातील कोणत्या नेत्यांनी फोन केले, अपक्ष नगरसेवकांना कुणी रसद पुरविली, याचा उल्लेख थेट वडेट्टीवार यांचे नाव न घेता केला. महापालिकेत सत्ता मिळविण्यात अपयश आल्याचे खापर त्यांनी वडेट्टीवार यांच्यावरच फोडले.

