चंद्रपूर : काँग्रेस महासचिव के.सी.वेणुगोपाल यांच्यासोबत दिल्लीत बैठकीनंतर विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी महापौर तर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी गटनेते पदाचा बालहट्ट सोडला आहे.
दोन्ही नेत्यांनी एकेक पाऊल मागे घेत महापौर पदासाठी काँग्रेसतर्फे धानोरकर समर्थक माजी महापौर संगीता अमृतकर, सुनंदा धोबे, संगीता भोयर व महाडोळे या चार ओबीसी महिला उमेदवारांनी तर उपमहापौर पदासाठी वडेट्टीवार समर्थक वसंता देशमुख यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. दरम्यान वडेट्टीवार समर्थक नगरसेवक राजेश अडूर याची एकमताने गटनेता पदी निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान वडेट्टीवार व धानोरकर गटात मतभेद कायम असून दोन्ही गटाच्या उमेदवारांनी वेगवेगळे येवून नामनिर्देशनपत्र दाखल केले.
महापालिकेत सत्तास्थापनेसाठी भाजप सोबत लढण्याऐवजी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर मागील पंधरवाड्यापासून आपसात लढत होते. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही या दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्यात अपयश आल्यानंतर वडेट्टीवार व धानोरकर यांनी दिल्लीत धाव घेवून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
काँग्रेस महासचिव के.सी.वेणुगोपाल यांनी मध्यस्थी केल्यानंतर महापौर धानोरकर गटाकडे तर गटनेते पद वडेट्टीवार गटाला देण्याचा तोडगा निघाला. दरम्यान हा तोडगा निघाल्यानंतरही धानोरकर समर्थक नगरसेवक दहा नगरसेवक वेगळे महापालिकेत आले. यावेळी काँग्रेसच्या वतीने संगीता भोयर, संगीता अमृतकर, सुनंदा धोबे व वैशाली महाडोळे या चार नगरसेविकांनी महापौर पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केलेे. तर वडेट्टीवार गटाचे नगरसेवक पडोली येथे थांबून होते. धानोरकर गटाचे नगरसेवक महापौर पदाचा नामनिर्देशनपत्र दाखल करून निघून गेल्यावर वडेट्टीवार गटाचे वसंता देशमुख पालिकेत आले आणि त्यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले.
दरम्यान वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलतांना ले काही दिवस चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस बाबत संभ्रमाचे वातावरण होते. दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर अखेरीस तोडगा निघाला. उपमहापौर पदी अनुभवी आणि काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार वसंत देशमुख यांनी अर्ज भरला तर गटनेते पदी वडेट्टीवार समर्थक राजेश अडूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजेश अडूर यांच्या नियुक्तीचे पत्र देखील पक्षाकडून अधिकृतरित्या विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे अशी माहिती दिली.
दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देखील महापौर पदासाठी मनस्वी गिऱ्हे यांनी अर्ज दाखल केला आहे. उपमहापौर पदासाठी खासदार धानोरकर समर्थक राहुल चौधरी यांनी अर्ज दाखल केला आहे. याबाबत चर्चा होऊन अर्ज मागे घेण्यात येईल असे वडेट्टीवार यांनी सांगितले. काँग्रेसचे विदर्भ प्रभारी कुणाल चौधरी म्हणाले की चंद्रपूरच्या जनतेने काँग्रेसला कौल दिला आहे.
चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर होणार,चंद्रपूरच्या विकासासाठी काँग्रेस काम करणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सध्या काँग्रेसकडे २७ नगरसेवक असून जनविकास सेना पप्पू देशमुख यांचे तीन नगरसेवक काँग्रेसबरोबर आहेत.त्यांना एमआयएम पक्षाने पाठिंबा दिल्याने ते एक नगरसेवक जानविकास सेनेबरोबर आहे.बसपाने देखील काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सध्या ३२चे संख्याबळ असून अजून २ नगरसेवकांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. याबाबत सर्व स्तरावर चर्चा सुरू असल्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले.
चंद्रपूर महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला स्थायी समिती देण्याची तयारी काँग्रेसने दर्शवली असून त्या पक्षातील पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू असून अंतिम निर्णय लवकरच होईल असे ही वडेट्टीवार म्हणाले.

