चंद्रपूर : पडद्यामागे राहून भाजपच्या अनेक नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत माझ्यासाठी काम केले, असे वक्तव्य काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केल्याने भाजपत अस्वस्थता पसरली आहे. कुणबी समाजाचे अनेक जण भाजपत महत्वाच्या पदावर आहेत. माजी आमदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षांपासून माजी नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य आहेत. धानोरकरांच्या या वक्तव्याने कुणबी समाजातून येणाऱ्या या सर्वांकडे संशयाच्या नजरेतून बघितले जात आहे.

काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचे सध्या सत्कार सोहळे सुरू आहेत. वणी येथे झालेल्या रॅली व सत्कार कार्यक्रमातील भाषणात खासदार धानोरकर म्हणाल्या, केंद्र सरकारच्या कामावर भाजपचे अनेक निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज होते. त्यांनाही मोदी सरकार पडावे असे वाटत होते. त्यामुळेच भाजपतील अनेक नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पडद्यामागे राहून निवडणुकीत मला मदत केली. धानोरकर यांच्या या वक्तव्याने काँग्रेसला मदत करणारे भाजपतील नेते, पदाधिकारी कोण असा प्रश्न भाजपच्या स्थानिक नेत्यांना पडला आहे. चंद्रपूर, राजुरा, वणी व वरोरा या चार विधानसभा मतदार संघात कुणबी समाजाची मते अधिक आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायत, ग्राम पंचायतमध्ये पदाधिकारी असलेल्या कुणबी समाजाच्या अनेक युवकांना भाजपने मोठे केले. भाजपने अनेकांना आमदार केले. परंतु, याच समाजाच्या भाजपतील काहींनी दगा केला. काम केले नाही अशीही चर्चा धानोरकर यांच्या वक्तव्यानंतर सुरू झाली आहे.

हेही वाचा…Monsoon Update : राज्यात वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ भागात ‘येलो अलर्ट’…

केवळ कुणबी समाजाचेच नाही तर तेली, बौध्द व मुस्लीम समाजाच्या पदाधिकाऱ्यांनीही कामे केली नाहीत, अशीही चर्चा रंगली आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात राजकीय मतभेद आहेत. अहीर हे देखील मुनगंटीवार यांच्या प्रचारात सक्रिय नव्हते. त्यामुळे धानोरकर यांच्या या वक्त्व्याने अहीर यांच्याकडेही अनेक जण संशयाच्या नजरेने बघत आहेत. विशेष म्हणजे, २०१९ मध्ये अहीर यांचा पराभव झाला तेव्हा देखील मुनगंटीवार यांच्याविषयी असाच सूर उमटला होता. मुनगंटीवार यांना मिळालेली प्रभाग निहायमते बघितली तर भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी खरच प्रचार केला की ते घरी बसून होते, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.