चंद्रपूर : महापालिकेत काँग्रेस पक्षात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठरवून दिलेले काँग्रेसचे अधिकृत गटनेते राजेश अडूर यांना खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक १६ नगरसेवकांनी एकत्र येत अचानक पदावरून हटवून त्यांच्या जागी सुरेंद्र अडबाले यांच्या रूपाने नवीन गटनेत्याची निवड केली. मात्र, या राजकीय घडामोडीमुळे एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे की काँग्रेस पक्षात नक्की श्रेष्ठ कोण? प्रदेशाध्यक्षांचा अर्थात पक्षाचा आदेश की खासदारांची वैयक्तिक इच्छा? ही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
महापालिकेत खासदार धानोरकर यांनी महापौर पदासाठी आग्रह धरला होता. तेव्हा दिल्ली व महाराष्ट्रातील नेत्यांनी धानोरकर गटाला महापौर तर विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार गटाला गटनेता पद दिले होते. त्यानंतरच ६ फेब्रुवारीला राजेश अडूर यांची सर्व २७ नगरसेवकांच्या संमतीने काँग्रेस गटनेता पदी निवड करण्यात आली होती.
मात्र, आज खासदारांनी दिल्ली व महाराष्ट्रातील पक्ष नेतृत्वाला विश्वासात न घेता स्वअधिकारात अडूर यांना १६ नगरसेवकांच्या समर्थनाच्या बळावर गटनेता पदावरून हटवले. त्यामुळे पक्षात १६ विरूध्द ११ अशी दुफळी निर्माण झाली आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की, पक्षाचा जो मूळ आदेश होता, तो धानोरकरांनी धुडकावून लावला. जर लोकप्रतिनिधीच पक्षाच्या आदेशापेक्षा स्वतःला मोठे समजू लागले, तर पक्ष शिस्त कुठे उरते? असाही प्रश्न आता या राजकीय घडामोडींमुळे उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण घडामोडीदरम्यान आमदार विजय वडेट्टीवार विदेशात आहेत.
पक्ष नेतृत्वाचा पराभव?
नेत्यांमधील अंतर्गत स्पर्धा बाजूला ठेवून निष्पक्षपणे पाहिले, तर हा वडेट्टीवार यांचा पराभव नाही. तर थेट पक्ष नेतृत्वाचा पराभव आहे अशाही प्रतिक्रिया काँग्रेस निष्ठावंत व्यक्त करित आहे. पक्षाने घेतलेले निर्णय खासदार स्वत:च्या सोयीनुसार बदलत असतील, तर यामुळे पक्षाच्या निर्णयाला आणि पक्षश्रेष्ठींच्या अधिकारालाच आव्हान दिले गेले आहे अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. धानोरकर यांनी नागपुरात इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी बोलताना गटनेता नगरसेवकांना विश्वासात घेत नाही. त्यामुळे गटनेता बदलून द्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती. मात्र, प्रदेशाध्यक्षांसह सर्वांनीच त्याकडे दुर्लक्ष केले, असे त्यांचे म्हणणे आहे.
धानोरकरांचा युक्तिवाद, राजकीय चर्चा
अडूर नगरसेवकांना विश्वासात घेत नसल्याने काँग्रेसच्या १६ नगरसेवकांनी एकत्र येत गटनेता बदलाची प्रक्रिया सुरू केली. या सर्व प्रक्रियेत नगरसेवकांनी त्यांनाही सोबत घेतले, असा युक्तीवाद आता खासदार धानोरकर करीत आहेत. मात्र, गटनेता बदलाच्या प्रक्रियेत खासदार धानोरकर यांनी दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वच नेत्यांना दूर ठेवल्याने आता विविध पातळ्यांवर अनेक राजकीय चर्चा सुरू झाल्या आहे.
