चंद्रपूर : महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेतेपदावरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये गटनेते राजेश अडूर यांनी प्रथमच प्रतिक्रिया देत आपल्या विरोधातील हालचालींना सामाजिक मानसिकतेची किनार असल्याचा आरोप केला आहे. आपण दलित समाजातील असल्यामुळेच काँग्रेस पक्षातील काही नेते आपल्याला गटनेतेपदावरून हटविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा त्यांनी केला.
सामाजिक पूर्वग्रहही कारणीभूत
अडूर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेसमधील काही नेते गटनेतेपद बदलण्यासाठी प्रयत्नशील असून त्यामागे केवळ राजकीय कारणे नसून सामाजिक पूर्वग्रहही कारणीभूत असल्याचे दिसून येते. “दलित समाजातील व्यक्ती गटनेतेपदी असणे काहींना मान्य नसल्याने माझ्याविरोधात वातावरण तयार केले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
बुधवारी रात्रीपासून काँग्रेसच्या काही नगरसेवकांचे मोबाईल फोन संपर्काबाहेर असल्याचे निदर्शनास आले. तसेच काही नगरसेवकांना अज्ञात स्थळी नेण्यात आल्याच्या बातम्या समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या असून, या सर्व हालचाली गटनेतेपद बदलण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे स्पष्ट होत असल्याचा दावा त्यांनी केला.
काँग्रेसचे नगरसेवक माझ्या पाठीशी ठामपणे उभे
तथापि, काँग्रेसचे बहुसंख्य नगरसेवक आपल्या संपर्कात असून गटनेते बदलण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ विरोधकांकडे नसल्याचा विश्वास अडूर यांनी व्यक्त केला. “काही जण राजकीय डावपेच रचत असले तरी त्यांना यश मिळणार नाही. काँग्रेसचे नगरसेवक माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. त्यामुळे गटनेते बदलण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होणार नाही,” असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, महापालिकेतील काँग्रेसमधील वाढत्या हालचालींमुळे आगामी काही दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
