चंद्रपूर : विधानसभा, महापालिका, चंद्रपूर जिल्हा बँक निवडणूक, अशी पराभवाची मालिका सुरू असताना केवळ कागदोपत्री संघटन बदलासाठी काँग्रेसने संघटन सृजन अभियान हाती घेतले. खासदार व आमदारांच्या हस्तक्षेपाशिवाय जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष निवडीची ही प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे निरीक्षकांकडून सांगितले जात असले तरी इच्छुक उमेदवारांची नावे बघता खासदार प्रतिभा धानोरकर व आमदार विजय वडेट्टीवार यांच्या मर्जीतील उमेदवारांचीच संख्या अधिक दिसत आहे. त्यामुळे हे कुठले संघटन सृजन, असा प्रश्न आता कार्यकर्त्यांमधून उपस्थित होत आहे.
अखिल भारतीय काँग्रेस समितीतर्फे देशभरात संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून संघटनेत फेरबदल केले जात आहे. खासदार व आमदारांपेक्षा अधिक महत्त्व जिल्हाध्यक्ष किंबहुना संघटनेला मिळावे, यासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे निरीक्षक संतोष कोलकोंडा यांनी सांगितले. मात्र, मागील तीन दिवसांपासून निरीक्षकांकडे आलेली नावे बघितली तर खासदार धानोरकर व आमदार वडेट्टीवार यांच्या मर्जीतील उमेदवार अधिक दिसत आहेत.
वडेट्टीवार गटाकडून ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी संतोष रावत यांचे नाव जवळपास निश्चित केले गेले आहे. सोबतच शहर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी, बापू धोटे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिनेश चोखारे, राजुराचे माजी आमदार तथा विद्यमान जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांचे भाऊ आणि राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांनीही उमेदवारी दाखल केली आहे.
चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्षपदासाठी बरेच जण इच्छुक आहेत. त्यामध्ये वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक नगरसेवक सचिन कत्याल, विधानसभेचे पराभूत उमेदवार प्रवीण पडवेकर, प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष संतोष लहामगे, गोपाल अमृतकर, दिलीप कांबळे, उमाकांत धांडे, माजी नगराध्यक्ष सुनीता लोढीया यांच्यासह इतर अनेका इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
सिव्हिल सोसायटीपासून पत्रकार, तर जिल्हाध्यक्ष, खासदार, आमदारांपासून सामान्य कार्यकर्ता, या सर्वांसोबत ‘वन टू वन’ चर्चा करून आणि तीन ते पाच हजार नागरिकांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संवाद साधून अध्यक्षांची निवड केली जाईल, असे निरीक्षक कोलकोंडा यांनी सांगितले. मात्र इच्छुकांची नावे बघितली तर नेत्यांचे समर्थकच अधिक दिसून येत आहे. त्यामुळे सामान्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांला खरच जिल्हाध्यक्ष बनण्याची संधी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
निरीक्षकांनी एनडी हॉटेल येथे सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेतली तेव्हा वरोरा, राजुरा, ब्रह्मपुरी व मूल या चार तालुक्यांतील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिसून आले. चंद्रपूर शहरातील मोजकेच कार्यकर्ते होते. त्यामुळे नेत्यांच्या मर्जीतीलच व्यक्तीकडे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षपदाची धुरा सोपविली जाईल, अशीही चर्चा आहे. हे कुठले संघटन सृजन, जिथे नेत्यांच्या मर्जीतील इच्छुकांचीच नावे समोर केली जात आहे, असा प्रश्न सामान्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. या नावांमध्ये नेत्यांच्या नातेवाईकांचाही समावेश आहे.
