चंद्रपूर : अवघ्या वीस दिवसांपूर्वी प्रेमविवाह करून संसाराची स्वप्ने रंगविणाऱ्या दाम्पत्याच्या नात्याला चारित्र्याच्या संशयाने काळिमा फासल्याची संतापजनक घटना चंद्रपूरमध्ये समोर आली आहे. पत्नीच्या भ्रमणध्वनीवर वारंवार अनोळखी व्यक्तींचे फोन येत असल्याचा संशय घेत पतीने मित्राच्या मदतीने तिला भरदिवसा स्मशानभूमीत नेले आणि तेथे तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी पतीसह त्याच्या मित्राला अटक केली आहे.

दुर्गापूर येथील हसन ऊर्फ अल्ताफ सलीम शेख (२६) याने ६ ऑगस्ट रोजी संबंधित महिलेशी नोंदणी विवाह केला होता. दोघे भिन्न धर्मीय असल्याने विवाहानंतर पत्नीला हसनने आपल्या घरी नेले नव्हते. ती आईसोबत राहत होती. दरम्यान, दोन्ही कुटुंबांकडून रीतिरिवाजानुसार विवाह सोहळ्याची तयारी सुरू होती आणि लग्नाची तारीख निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू होती. फोन व्यस्त येत असल्याने संशयाची ठिणगी दरम्यानच्या काळात पत्नीशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधताना तिचा फोन वारंवार व्यस्त येत असल्याने हसनच्या मनात संशय निर्माण झाला. पत्नी त्याच्यासोबत असतानाही तिच्या भ्रमणध्वनीवर अनोळखी व्यक्तींचे फोन येत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. या संशयातून त्यांच्यात वाद होऊ लागल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

२५ ऑगस्ट रोजी हसनने पत्नीला फोन केला. त्यावेळीही तिचा फोन व्यस्त होता. त्यामुळे तो थेट तिच्या घरी पोहोचला. त्या वेळी पत्नी भ्रमणध्वनीवर बोलत होती. हसनने तिच्या हातातील भ्रमणध्वनी घेतला आणि समोरच्या व्यक्तीशी संवाद साधला. त्यानंतर संतापलेल्या अवस्थेत तो तेथून निघून गेला.

प्रशिक्षण केंद्रातून दुचाकीवर नेले

काही वेळाने संबंधित महिला जवळच्या शिवणकला प्रशिक्षण केंद्रात गेली. दरम्यान, हसनने त्याचा मित्र कुणाल बोरकर (१९) याला दुचाकीवर सोबत घेतले आणि तो प्रशिक्षण केंद्रात पोहोचला. तेथून पत्नीला सोबत घेऊन दोघेही वेकोलिच्या शक्तीनगर वसाहतीतील स्मशानभूमीत गेले.
पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, तेथे हसनने महिलेवर अत्याचार केला. तसेच त्याने कुणाललाही तिच्यावर अत्याचार करण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारानंतर दोघेही तेथून निघून गेले.

घरी परतल्यानंतर कुटुंबीयांना सांगितला प्रकार

घडलेल्या प्रकारानंतर पीडिता घरी परतली. मानसिक धक्क्यात असलेल्या तिने कुटुंबीयांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला घेऊन दुर्गापूर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे दुर्गापूर पोलिसांनी हसन आणि कुणाल या दोघांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७०(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली.

संशयाने नात्याची राखरांगोळी

ज्या नात्याची सुरुवात प्रेमाने आणि आयुष्यभराच्या सोबतीच्या आशेने झाली, त्याच नात्याला अवघ्या काही दिवसांत संशय, संताप आणि हिंसाचाराने गालबोट लागले. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याच्या कारणातून पतीने कायदा हातात घेतल्याचा आरोप असून, या प्रकरणाने वैवाहिक नात्यातील विश्वास आणि परस्पर सन्मानाच्या प्रश्नाला पुन्हा ऐरणीवर आणले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, घटनेच्या पार्श्वभूमीचा तसेच आरोपींच्या भूमिकेचा सखोल तपास केला जात आहे.