चंद्रपूर : घरफोडी, वाहन चोरी किंवा दागिने चोरीच्या घटना नेहमीच कानावर येतात; मात्र चंद्रपूर जिल्हा सत्र न्यायालयातून थेट महत्त्वाच्या खटल्यांच्या फाइल्सच चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, गहाळ झालेली केस परत करण्यासाठी न्यायालयातील वरिष्ठ लिपिकाकडे तब्बल ५० हजार रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या डाटा एंट्री ऑपरेटरला अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ लिपिक सतीश उगले यांच्या ताब्यात असलेली फौजदारी अपील क्रमांक ३/२५ (रामराज विरुद्ध सरकार) ही केस गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी न्यायालय प्रशासनाने उगले यांना विभागीय चौकशीसाठी नोटीस बजावली. विशेष म्हणजे, नोटीस मिळाल्याच दिवशी प्रदीप लांडगे (रा. विसापूर) याने उगले यांना दूरध्वनी करून गहाळ झालेली केस आपल्याकडे असून ती परत हवी असल्यास ५० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याचा आरोप आहे. लांडगे हा बाह्य यंत्रणेमार्फत जिल्हा न्यायालयात कंत्राटी पद्धतीने डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत होता.

२५ हजार रुपये दिले; तरी केस परत नाही

खंडणीच्या मागणीनंतर १० ऑगस्ट रोजी लिपिक उगले आणि लांडगे यांची एका हॉटेलमध्ये भेट झाली. यावेळी एक साक्षीदारही उपस्थित होता. चर्चेदरम्यान उगले यांनी लांडगे याला २५ हजार रुपये रोख दिले आणि केस परत करण्याची मागणी केली. त्यावेळी लांडगे याने केस दुचाकीच्या डिक्कीत असल्याचे सांगत केवळ फाइल दाखवली. मात्र, ती परत केली नाही. उर्वरित २५ हजार रुपये दिल्यानंतर केस परत करण्याचे सांगून तो तेथून निघून गेला. त्यानंतर उगले यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करून प्रदीप लांडगे याला अटक केली. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(२) आणि ३१६(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

आणखी तीन प्रकरणांच्या फाइल्सही गहाळ

दरम्यान, या प्रकरणात विशेष पॉक्सो केस क्रमांक १९३/२५ (सरकार विरुद्ध विनय), दिवाणी अपील क्रमांक ३१/२४ (सुषमा विरुद्ध विनोद) आणि नियमित दिवाणी मुकदमा क्रमांक २१६/२५ (सुषमा विरुद्ध विनोद) या प्रकरणांच्या फाइल्सचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे न्यायालयातील महत्त्वाच्या प्रकरणांच्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या सर्व फाइल्स नेमक्या कशा गहाळ झाल्या, याचा तपास आता पोलिसांकडून करण्यात येत आहे.