चंद्रपूर : नामांकित विद्यापीठांच्या नावाने बनावट पदव्या, गुणपत्रिका आणि स्थलांतर प्रमाणपत्रे (मायग्रेशन सर्टिफिकेट) तयार करून त्यांची लाखो रुपयांना विक्री करणाऱ्या कथित रॅकेटचा सूत्रधार परिमल गौरकर (३२) याची एलएलबीची पदवी आणि गुणपत्रिकाही बनावट असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. याच कथित बनावट शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे त्याने बार कौन्सिलची सनद मिळवून नागपूर उच्च न्यायालयात वकिली केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाची संबंधित शैक्षणिक संस्था आणि बार कौन्सिलकडून पडताळणी सुरू आहे.
दरम्यान, दुर्गापूर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी नागपुरातील कोराडी येथील एका हॉटेलमधून परिमल गौरकर आणि त्याचा कथित साथीदार अक्षय खोब्रागडे (३०) यांना ताब्यात घेऊन अटक केली. या कारवाईनंतर बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या रॅकेटप्रकरणी अटकेतील आरोपींची संख्या तीन झाली आहे. यापूर्वी पोलिसांनी परिमलचा नातेवाईक तथा कथित एजंट वैभव सोनुले याला अटक केली होती.
चंद्रपूर येथील वैभव माशीरकर यांनी परिमल गौरकर हा बनावट पदवी, गुणपत्रिका आणि मायग्रेशन प्रमाणपत्रे तयार करून त्यांची विक्री करीत असल्याची तक्रार दुर्गापूर पोलीस ठाण्यात केली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर आणि पोलीस उपनिरीक्षक रवींद्र नक्कनवार यांनी तपास सुरू केला.
चौकशीतून नागपूरपर्यंत धागेदोरे
तपासाच्या सुरुवातीलाच पोलिसांनी परिमल गौरकरचा नातेवाईक आणि कथित एजंट वैभव सोनुले याला अटक केली. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक नागपुरात पोहोचले. कोराडी येथील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या परिमल गौरकर आणि अक्षय खोब्रागडे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या कथित रॅकेटमध्ये वैभव सोनुले याच्यासह काही जण ग्राहक शोधून त्यांना परिमल गौरकरकडे आणत होते. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या गरजेनुसार बनावट पदवी, गुणपत्रिका किंवा मायग्रेशन प्रमाणपत्र तयार करून दिले जात असल्याचा संशय आहे.
पाच ते दहा लाखांत बनावट प्रमाणपत्रे?
या बनावट प्रमाणपत्रांची पाच ते दहा लाख रुपयांपर्यंत विक्री केली जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे, या प्रमाणपत्रांचा वापर केवळ पुढील शिक्षणासाठीच नव्हे, तर शासकीय नोकरी मिळविण्यासाठी किंवा सेवेत पदोन्नती मिळविण्यासाठीही करण्यात आला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
चार वर्षे एलएलबी परीक्षेत अपयश
या प्रकरणातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे तयार केल्याचा आरोप असलेल्या परिमल गौरकरने स्वतःचीच एलएलबीची पदवी आणि गुणपत्रिका बनावट तयार केल्याचा संशय आहे. पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांच्या माहितीनुसार, गौरकर हा एलएलबीचा विद्यार्थी होता. मात्र, सलग चार वर्षे एलएलबीच्या परीक्षेत अपयशी ठरल्यानंतर त्याने स्वतःची बनावट पदवी आणि गुणपत्रिका तयार केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यानंतर याच कागदपत्रांच्या आधारे बार कौन्सिलची सनद मिळवून नागपूर उच्च न्यायालयात वकिली सुरू केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत खातरजमा अद्याप बाकी असून संबंधित विद्यापीठ, बार कौन्सिल आणि इतर यंत्रणांकडून कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.
अनेक विद्यापीठांच्या नावांचा गैरवापर
परिमल गौरकर याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठासह कोल्हापूर, सोलापूर तसेच राजस्थान आणि कर्नाटकातील विविध विद्यापीठांच्या नावाने बनावट पदव्या व गुणपत्रिका तयार केल्याचा आरोप आहे. ही बनावट कागदपत्रे नेमकी कोणत्या पद्धतीने तयार केली जात होती, त्यासाठी कोणते तंत्रज्ञान किंवा साहित्य वापरले जात होते, तसेच या रॅकेटमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत, याचा तपास दुर्गापूर पोलीस करीत आहेत. बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी किंवा पदोन्नती मिळविणाऱ्या व्यक्तींचाही शोध घेतला जाण्याची शक्यता आहे.
