चंद्रपूर : नामांकित विद्यापीठांच्या बनावट पदवी आणि गुणपत्रिका विक्रीचे रॅकेट उघडकीस आल्यानंतर तपासाला धक्कादायक वळण मिळाले आहे. विवाहासाठी संपन्न कुटुंबातील मुलगी मिळावी, यासाठी काही युवकांनी लाखो रुपये मोजून बनावट पदव्या खरेदी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. दरम्यान, दुर्गापूर पोलिसांच्या तपासात आरोपी परिमल गौरकर आणि अक्षय खोब्रागडे यांच्याकडून कर्नाटक स्टेट ओपन युनिव्हर्सिटीच्या आणखी काही बनावट पदव्या हस्तगत केल्याने या रॅकेटची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

दोन्ही आरोपी ३ सप्टेंबर पर्यंत कोठडीत

या प्रकरणातील दोन्ही आरोपींना मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने परिमल गौरकर आणि अक्षय खोब्रागडे यांच्या पोलीस कोठडीत ३ सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे बनावट पदवी प्रकरणाच्या तपासाला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे. दुर्गापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तपासात बनावट पदवी आणि गुणपत्रिका विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस आले. या प्रकरणात परिमल गौरकर, अक्षय खोब्रागडे आणि वैभव सोनुले या तिघांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी वैभव सोनुले याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. परिमल आणि अक्षय या दोघांची १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी होती. या कालावधीत पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असता कर्नाटक स्टेट ओपन युनिव्हर्सिटीच्या आणखी काही पदव्या पोलिसांच्या हाती लागल्या. या पदव्या बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

विवाह जुळवण्यासाठी पदवीचा वापर

मात्र या प्रकरणातील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे बनावट पदवीचा वापर केवळ नोकरी किंवा शैक्षणिक पात्रता दाखविण्यासाठीच नव्हे, तर विवाह जुळविण्यासाठीही झाल्याचे तपासात समोर आले आहे. काही युवकांनी आपली शैक्षणिक पात्रता मोठी भासवून संपन्न कुटुंबातील मुलगी मिळावी, या उद्देशाने लाखो रुपये खर्च करून बनावट पदव्या खरेदी केल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

रॅकेटची व्याप्ती वाढण्याची शक्यता

बनावट पदव्या कोणाकडून तयार केल्या जात होत्या, त्या कोणत्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जात होत्या, त्यासाठी किती रक्कम आकारली जात होती आणि या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. परिमल गौरकर आणि अक्षय खोब्रागडे यांना पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे या काळात पोलिसांकडून रॅकेटच्या आर्थिक व्यवहारांसह बनावट प्रमाणपत्रांचे जाळे आणि त्यातील अन्य संबंधितांचा शोध घेतला जाणार आहे. बनावट पदवी विक्रीच्या या रॅकेटने आता शिक्षण क्षेत्राबरोबरच विवाहसंस्थेतही फसवणुकीचे धक्कादायक धागे उघड केले असून, तपास पुढे जात असताना आणखी किती बनावट पदवीधारक समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.