चंद्रपूर : दुष्काळ, नापिकी आणि वाढत्या आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर वरोरा तालुक्यातील भटाळा येथील ६३ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. चिंधू रामचंद्र बावणे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी त्यांचा मृत्यू झाला.
बावणे यांच्याकडे अवघी दीड एकर शेती होती. याच अल्पशा शेतीच्या उत्पन्नावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून होता. गेल्या शुक्रवारी त्यांनी शिंगाड्याच्या पिकावर फवारणी करण्यासाठी आणलेले कीटकनाशक प्राशन केले. ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने भटाळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील काही भागांत दुष्काळसदृश परिस्थिती, नापिकी आणि शेतीशी संबंधित आर्थिक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर बावणे यांच्या आत्महत्येने अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या वाढत्या संकटाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
