चंद्रपूर : दुर्गापूर येथील शक्तीनगर परिसरात सोमवारी रात्री उशिरा एका पित्याने आपल्या दोन मुलांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात सात वर्षीय देवांश बदखल याचा मृत्यू झाला, तर त्याचा ११ वर्षीय मोठा भाऊ सुशांत गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मंगेश बदखल (४०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगेश बदखल हा आपल्या दोन मुलांसह त्याचा भाऊ राहुल बदखल यांच्या वेकोलिच्या एम-२९ क्रमांकाच्या निवासस्थानात राहत होता. राहुल हे वेकोलिमध्ये कार्यरत आहेत. मंगेश ऑटोरिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असल्याचे सांगण्यात येते.

मंगेशची पत्नी काही काळापूर्वी त्याला सोडून गेली होती. तिला पुन्हा घरी आणण्यासाठी तो प्रयत्न करीत होता. मात्र, त्यात यश न आल्याने तो मानसिक तणावात असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. याच तणावातून त्याने मुलांवर हल्ला केला असावा, अशी चर्चा आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सोमवारी रात्री ही घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपीला ताब्यात घेतले. जखमी सुशांतला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमी देवांशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलिस अधिकारी चौगुले यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी रात्री साडेनऊच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली..या घटनेमुळे शक्तीनगर परिसरासह चंद्रपूर शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून हल्ल्यात वापरलेल्या धारदार शस्त्रासह अन्य बाबींचा तपास सुरू केला आहे. आरोपीच्या चौकशीतून हल्ल्यामागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा विविध बाजूंनी तपास केला जात आहे.