चंद्रपूर : सणासुदीच्या काळात नागरिकांना निर्भेळ अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत भेसळीच्या संशयावरून तब्बल ३६ लाख रुपये किमतीचा ८ हजार ९८८ किलो अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. खाद्यतेल, खवा, मिरची, हळद, धनिया पावडर, विविध मसाले, गूळ, शेंगदाणे आणि चहा पावडर अशा पदार्थांचा त्यात समावेश आहे. विशेष म्हणजे, तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळलेल्या १० आस्थापनांचे परवाने अथवा नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित करण्यात आली आहेत.

अन्न व औषध प्रशासनाच्या चंद्रपूर कार्यालयाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ९२ अन्न आस्थापनांची तपासणी केली. यावेळी १७० अन्ननमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५१ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या. तर भेसळीच्या संशयावरून १५ प्रकरणांत मोठ्या प्रमाणावर अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. दरम्यान, १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत प्रशासनाने जिल्ह्यातील २४३ आस्थापनांची तपासणी केली. यामध्ये ३१६ अन्ननमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले. त्यापैकी २१० नमुने प्रमाणित ठरले, तर ९६ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. तीन नमुने कमी दर्जाचे, पाच नमुने मिथ्याछाप, तर दोन नमुने असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणांपैकी आठ प्रकरणांत सहआयुक्त, नागपूर यांच्याकडे न्यायनिर्णयासाठी खटले दाखल करण्यात आले आहेत. या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३५ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या. दहा आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर २९ आस्थापनांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून दोन लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय कमी दर्जाच्या अन्नपदार्थांचा संशय आल्याने १५ प्रकरणांत ३६ लाख रुपये किमतीचा ८,९८८ किलो साठा जप्त करण्यात आला.

तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक

अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा complaints.mahafda.in या संकेतस्थळावर तक्रार करावी. तक्रारीत स्वतःचे नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, संबंधित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि तक्रारीचे स्वरूप नमूद करणे आवश्यक आहे. अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच नियम व नियमन २०११ मधील तरतुदींचे पालन करूनच व्यवसाय करावा. नागरिकांना निर्भेळ अन्न मिळणे हा त्यांचा अधिकार असून, अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. ही माहिती चंद्रपूरचे सहायक आयुक्त प्र.अ. उमप यांनी दिली.