नागपूर : आयुष्यभर नागरिकांचे आगीपासून संरक्षण करणाऱ्या चंद्रपूर येथील अग्निशमन विभागातील जवान अमित बबन आंबेकर यांनी मृत्यूनंतरही समाजसेवेचा वसा कायम ठेवला. भीषण अपघातानंतर मेंदूमृत घोषित झालेल्या अमित यांच्या कुटुंबीयांनी यकृत, दोन्ही मूत्रपिंडे आणि नेत्रदानाचा निर्णय घेतल्याने अनेक रुग्णांना नवजीवनी मिळाली. दुःखाच्या क्षणी घेतलेल्या या निर्णयामुळे चार कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे.
अमित आंबेकर कोण होते?
अमित बबन आंबेकर (३३) हे चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली येथील रहिवासी असून अग्निशमन विभागात फायरमन म्हणून कार्यरत होते. कर्तव्यनिष्ठ आणि सेवाभावी स्वभावामुळे ते सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय होते.
अपघात नेमका कसा झाला?
नऊ जून रोजी अमित दुचाकीने जात असताना दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सुरुवातीला त्यांच्यावर घुग्घुस आणि चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयांत उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले.
डॉक्टरांनी काय प्रयत्न केले?
नागपूर येथे अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. सर्व आवश्यक तपासण्या आणि उपचार करूनही मेंदूमध्ये तीव्र रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती खालावत गेली. अखेर वैद्यकीय समितीने सर्व निकष पूर्ण केल्यानंतर त्यांना मेंदूमृत घोषित केले.
कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय कसा घेतला?
रुग्णालयातील प्रत्यारोपण समन्वयकांनी अमित यांच्या कुटुंबीयांना संपूर्ण परिस्थिती समजावून सांगितली. यानंतर वडील बबन आंबेकर, भाऊ शशांक आंबेकर, काका राजकुमार आंबेकर आणि अन्य नातेवाईकांनी समाजहिताचा विचार करून अवयवदानास संमती दिली.
कोणते अवयव दान करण्यात आले?
कुटुंबीयांनी अमित यांचे यकृत, दोन्ही मूत्रपिंडे आणि दोन्ही नेत्रदानास संमती दिली. त्यानंतर विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीमार्फत राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार अवयवांचे वाटप करण्यात आले.
अवयवांचा लाभ कोणाला झाला?
अमित यांचे यकृत नागपूर येथील ४६ वर्षीय पुरुष रुग्णाला प्रत्यारोपित करण्यात आले. एक मूत्रपिंड ३५ वर्षीय पुरुष रुग्णाला तर दुसरे मूत्रपिंड ४६ वर्षीय महिला रुग्णाला देण्यात आले. तसेच दोन्ही नेत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रदानासाठी जतन करण्यात आले.
रुग्णालयाने कशी दिली मानवंदना?
मेंदूमृत घोषित झाल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी अमित आंबेकर यांना ‘ऑनर कॉरिडॉर’द्वारे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांचे पार्थिव मूळ गावी नेण्यासाठी विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राने मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. अवयवदानासाठी अवयव प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डाॅ. मनिष श्रीगिरीवार, सचिव डाॅ. शैलेश गहुकर, समन्वयक दिनेश मंडपे, डाॅ. अविनाश गावंडे यांची भूमिका महत्वाची होती.
