चंद्रपूर : शहरातील आयटीआयलगत असलेल्या मनोज चिवडा सेंटरमधून खरेदी केलेल्या चिवड्यात पाल आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा चिवडा खाल्ल्यानंतर काही नागरिकांना उलट्या, मळमळ आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नागरिकांनी मनोज चिवडा सेंटरमधून चिवडा खरेदी केला होता. चिवडा खाल्ल्यानंतर काही वेळातच त्यांना उलट्या, मळमळ, अशक्तपणा तसेच प्रकृती अस्वस्थ होण्याचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, चिवड्यात पाल आढळल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

रुग्णालयात दाखल कोण ?

रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये सुवर्णा प्रवीण कोहळे (४५, माजरी), प्रवीण शालीकराम कोहळे (५०, माजरी), पंकज दिगंबर आवारी (४०, राळेगाव), दिगंबर विठ्ठजी आवारी (राळेगाव), अफजल रफीक अहमदखान (भद्रावती), शेख रेहमान (कोरेगाव) आणि आयुब सागीर खान (भद्रावती) यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, प्राथमिक माहितीत सहा जणांना विषबाधा झाल्याचे सांगण्यात आले असताना यादीत सात रुग्णांची नावे आहेत. त्यामुळे बाधित नागरिकांची नेमकी संख्या किती, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. रुग्णालय प्रशासन किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून याबाबत अधिकृत माहिती स्पष्ट होणे आवश्यक आहे.

घटनेची गांभीर्याने दखल

या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित चिवडा सेंटरमधील खाद्यपदार्थांची तपासणी करावी, नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करावी आणि दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.