नागपूर : चंद्रपूर वनविभागातील सावली वनपरिक्षेत्राअंतर्गत व्याहाड बुज कॅनल परिसरातून जेरबंद करण्यात आलेल्या वाघाचा शनिवारी गोरेवाडा प्रकल्पात मृत्यू झाला. दहा दिवसांपूर्वी पाच जानेवारीला गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रात त्याला ठेवण्यात आले होते.
गोरेवाड्यातील हा वाघ १३ जानेवारीला अचानक आजारी पडला. त्यामुळे वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मानक कार्यपद्धतीनुसार वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले.
हेही वाचा <<< “१०० कोटी द्या, अन्यथा…” गडकरींना मिळालेल्या धमकीचे प्रकरण नेमके काय?
वन्यप्राणी संशोधन व प्रशिक्षण केद्राचे उपसंचालक डॉ. विनोद धूत, पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या रोगनिदान शास्त्र विभागाचे डॉ. पी.एम. सोनकुसरे, केंद्राचे विषयतज्ज्ञ डॉ. मयूर पावशे, डॉ. शालिनी ए.एस., पशुधन विकास अधिकारी डॉ. किशोर भदाने, डॉ. भाग्यश्री भदाने या प्रक्रियेत सहभागी होते. वाघाच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच कळेल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर गोरेवाडा परिसरातच त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.