चंद्रपूर : नवीन वर्षाच्या सुरुवातीला तसेच १ व २ जानेवारीच्या रात्री वेकोलि वणी परिसरातील पैनगंगा कोळसा खाण परिसरात वाहन चालकांना पट्टेदार वाघ दिसल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. याशिवाय नजीकच्या विरूर, गाडेगाव, सोनुर्ली, सांगोला आणि आवरपूर परिसरातही वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. वाघाच्या या उपस्थितीने स्थानिक रहिवासी आणि शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. वेकोलि (वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड) जवळील एक प्रमुख रस्ता खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गहू व हरभरा पिकांची काळजी घेण्यासाठी शेतात जाण्यास अडचणी येत आहेत.

हेही वाचा – तरुण पत्रकाराच्या हत्येने समाजमन सुन्न, काँग्रेस नेत्याचा भ्रष्टाचार उघड केल्याने…

हेही वाचा – “पैसे देऊन मते घेतली, त्यावेळी निकष लावले नाही अन् आता…”, वडेट्टीवार यांचा सरकारला टोला

वाघाचे व्हिडिओ व फोटो समाज माध्यमात सार्वत्रिक झाले आहे. घुग्घुस, गाडेगाव, विरुर, सांगोली, आवरपुर परिसरात नववर्षाच्या पहिल्या दिवशी वाघ दिसल्याच्या घटनेने स्थानिक नागरिक आणि सोशल मीडियात खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती गाडेगाव चेक पोस्ट बंद करण्याबाबत बोलताना ऐकू येत आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार हा परिसर कामगारांसाठी प्रमुख मार्ग असून, येथे वाघ दिसल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधीही या भागात वाघ दिसण्याच्या घटना घडल्या असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र यावेळी नववर्षाच्या मुहूर्तावर ही बातमी लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. वनविभाग व स्थानिक प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. परिसरात गस्त घालण्यात यावी आणि लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात यावा. तसेच वाघाला सुरक्षितपणे जंगलात परत नेण्यासाठी तज्ज्ञांचे पथक बोलवावे. या घटनेने मानव आणि वन्यजीव यांच्यातील वाढत्या संपर्क आणि संघर्षाच्या समस्येवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे. दरम्यान वन खात्याने येथे पथक तैनात केले आहे.

Story img Loader