नागपुरातील तरुणाने घुग्घुसमधील एका तरुणीशी ‘फेसबुक’द्वारे मैत्री केली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. तरुणाने लग्नाचे खोटे आश्वासन देत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तरुणीचे आक्षेपार्ह छायाचित्रे काढली आणि बदनामी करण्याची धमकी दिली. यादरम्यान त्याने तरुणीचे काही आक्षेपार्ह छायाचित्रे समाजमाध्यमावर सार्वत्रिकही केली. प्रेमात धोका मिळालेल्या तरुणीने अखेर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.

नागपूर जिल्ह्यातील शुभम गणेश उईके (२३) असे आरोपीचे नाव आहे. शुभमची चंद्रपूर जिल्ह्यातील एका २३ वर्षीय तरुणीसोबत २०१८ साली फेसबुकद्वारे मैत्री झाली. तरुणाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. खोट्या शपथा आणि लग्नाचे आमिष दाखविले. तरुणीला भेटण्यासाठी तो घुग्घुसला येऊ लागला. यादरम्यान शुभमने तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि आक्षेपार्ह छायाचित्रे काढली. यानंतर ही छायाचित्रे समाजमाध्यमावर सार्वत्रिक करण्याची धमकी देत तरुणीसोबत अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

मात्र, एवढ्यावरच न थांबता काही छायाचित्रे समाजमाध्यमावर सार्वत्रिकही केली. तरुणीने याप्रकरणी घुग्घुस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करीत गुरुवारी आरोपी शुभम उईकेला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन पूसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.