चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील प्रस्तावित १२ गावांच्या जमीन अधिग्रहणाच्या विरोधात आयोजित शेतकरी परिषदेत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी पूर्ण ताकदीनिशी लढा उभारण्याचा इशारा दिला. “शेतकऱ्यांची जमीन हिसकावून विकासाच्या नावाखाली अन्याय केला जाणार असेल, तर त्याविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल,” असे ते म्हणाले. दरम्यान या क्षेत्राचे भाजपचे आमदार देवराव भोंगळे यांना १२ गावात ‘गावबंदी’ चा ठराव शेतकरी परिषदेत करण्यात आला.
गोंडपिपरी तालुक्यातील १२ गावांतील शेतजमिनी उद्योग निर्मितीसाठी अधिग्रहित करण्याबाबत शासनाने काही महिन्यांपूर्वी सूचना दिल्या होत्या. या प्रस्तावाला विरोध करत शेतकरी एकता संघर्ष कृती समितीच्या वतीने गोंडपिपरी येथील माता कन्यका सभागृहात दुसऱ्या शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला शेतकरी नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप, वंचित बहुजन आघाडीचे नेते तावाडे, ॲड. दीपक चटप, ॲड. बोधी रामटेके, किशोर वडेट्टीवार, संजय माडूरवार, मोरेश्वर सूरकर, भारत चंद्रगडे, कमलेश निमगडे, राजेश कवठे, कवडुजी कुंदावार, ॲड. आस्वले, रामकृष्ण सांगळे, अजय माडूरवार, सूरज माडूरवार, राजू झाडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “जमीन ही शेतकऱ्यांची आई आहे. त्या मातीत त्यांचे आयुष्य, संसार आणि भविष्य दडलेले आहे. उद्योगपतींच्या हितासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळ करू नये. कोणत्याही परिस्थितीत १२ गावांतील शेतजमीन अधिग्रहित होऊ देणार नाही.” सरकारच्या धोरणांवर टीका करताना त्यांनी म्हटले की, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता घेतले जाणारे निर्णय लोकशाहीला काळिमा फासणारे आहेत. “एका बाजूला शेतकरी कर्जबाजारीपणा, नापिकी आणि नैसर्गिक संकटांशी झुंज देत आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकार त्यांची जमीन हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी एकजूट राहण्याचे आवाहन करताना त्यांनी ही लढाई केवळ जमिनीची नसून अस्तित्वाची असल्याचे सांगितले. “शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, तर तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला. परिषदेत माजी आमदार ॲड. वामनराव चटप, ॲड. दीपक चटप आणि ॲड. बोधी रामटेके यांनीही कायदेशीर बाबी समजावून सांगत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.
‘गावबंदी’ करण्याचा ठरावही मंजूर
शेतकरी परिषदेत एका वृद्ध महिलेने डोळ्यांत अश्रू आणत सरकार आणि स्थानिक आमदारांविरोधात संताप व्यक्त केला. तसेच उपस्थित शेतकऱ्यांनी राजुरा विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार देवराव भोंगळे यांना १२ गावांत ‘गावबंदी’ करण्याचा ठरावही मंजूर केला. त्यानंतर शेतकरी आणि नेत्यांनी मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन सादर केले. या परिषदेला परिसरातील विविध गावांतील शेतकरी, ग्रामस्थ, संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
