चंद्रपूर: मोहर्ली वनपरिक्षेत्रातील मोहर्ली बिटअंतर्गत कक्ष क्रमांक १५४ मध्ये गुरे चारण्यासाठी गेलेल्या तरुणावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना शनिवारी (२९ ऑगस्ट) दुपारी घडली. या घटनेमुळे जुनोना परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विजय मधुकर मेश्राम (वय २५, रा. जुनोना) हे गुरे चारण्यासाठी मोहर्ली वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १५४ मध्ये गेले होते. दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात विजय मेश्राम यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मोहर्ली (प्रादेशिक) वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, पोलीस निरीक्षक शेगावकर व त्यांचे पथक तसेच दुर्गापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मानद वन्यजीव रक्षक मुकेश भांदककर आणि क्षेत्रीय वनकर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस पंचनामा तसेच घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, वन विभागाच्या वतीने मृताच्या आई निरंजना मधुकर मेश्राम यांना घटनास्थळी तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली.

दरम्यान, वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी संबंधित परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. तसेच जुनोना परिसरातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आणि जंगल परिसरात आवश्यक ती खबरदारी घेऊन कामे करण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास मोहर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहेत.