चंद्रपूर: महाराष्ट्राची पारंपरिक लोककला लावणीने रविवार १ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजून १७ मिनिटांनी चंद्रपूर शहरच नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णक्षण नोंदविला गेला. शहरातील विविध शाळांतील २ हजार ७०० विद्यार्थिनी व महिलांनी एकत्र येत एकाच वेळी ७ मिनिटे ३० सेकंदांत ७ लावणी नृत्य सादर करत विश्वविक्रम प्रस्थापित केला. या जागतिक उपक्रमाचे आयोजन चंद्रपूरच्या उत्कृष्ट महिला बहुउद्देशीय संस्था आणि सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने संयुक्तरित्या केले होते. या जागतिक पातळीवर विश्वविक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.
महाराष्ट्राची पारंपरिक नऊवारी साडी, ठसकेबाज हालचाली आणि तालबद्ध सादरीकरणामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. विशेष म्हणजे या विक्रमाची नोंद यापूर्वी २०१७ मध्ये कोल्हापूरात १ हजार ३३६ जणांनी लावणी नृत्य सादर करून केली होती. मात्र नऊ वर्षापूर्वीच्या या विक्रमाला मागे टाकत चंद्रपुरात नव्या विक्रमाची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे जागतिक तब्बल १८० देशांमध्ये प्रसारित होत जागतिक स्तरावर या विक्रमाची नोंद घेण्यात आली आहे तसेच या नृत्याचे थेट प्रसारण या सर्व देशात करण्यात आले आहे.
शहराच्या सांस्कृतिक इतिहासात हा क्षण सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला आहे. या लावणी नृत्य कार्यक्रमासाठी सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, चंद्रपूरचे पांडुरंग आंबटकर मुख्य आयोजक होते. उत्कृष्ट महिला मंचाच्या छबू वैरागडे, बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव साक्षी कार्लेकर आणि सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटचे संस्थापक अध्यक्ष पी. एस. आंबटकर यांनी विक्रमाचे प्रमाणपत्र स्वीकारताच चंद्रपूरकरांनी जल्लोष केला. या विश्वविक्रमाची नोंद घेण्यासाठी गिनिज बुक ऑफ रेकॉर्डने येथे विशेष टीम पाठवली होती. या टीमने लावणी सादरीकरणासोबतच सर्व गोष्टी आणि वेळीची नोंद घेऊन या विक्रमाची नोंद घेतली आहे. चंद्रपूर शहरातील सांस्कृतिक वारसा जपण्याच्या आणि मराठमोळ्या परंपरेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने उत्कृष्ट महिला मंच चंद्रपूर यांच्या वतीने या भव्य जागतिक विक्रम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असे सोमय्या ग्रुपचे पांडुरंग आंबटकर यांनी सांगितले.
सुरुवातीला जिल्ह्यातील सुमारे पाच हजार महिला व मुलींच्या सहभागातून सलग वीस मिनिटांत वीस लावण्या सादर केली जाणार होती. मात्र त्यानंतर २७०० महिला. व मुलींनी लावणी सादर केली. हा ऐतिहासिक सोहळा चांदा क्लब ग्राउंड येथे शहरातील शेकडो लोकांनी स्वतः हजर राहून अनुभवला. महाराष्ट्राच्या लावणी या पारंपरिक नृत्यप्रकाराला जागतिक स्तरावर मान्यता व सन्मान मिळवून देणे, नव्या पिढीत लावणीबद्दल आदर व अभिमान निर्माण करणे, तसेच मराठी भाषा व संस्कृतीचा गौरव वाढवणे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता असे उत्कृष्ट महिला मंचाच्या छबू वैरागडे यांनी सांगितले. उत्कृष्ट महिला मंच चंद्रपूर ही संस्था गेल्या काही वर्षांत महिला सशक्तीकरण, सांस्कृतिक जतन, सामाजिक जनजागृती, युवा कौशल्य विकास आणि एकता वाढविण्यासाठी विविध उपयुक्त कार्यक्रम यशस्वीपणे राबवत आली आहे.
महिलांच्या सहभागातून समाजाभिमुख उपक्रम उभारण्यामध्ये मंचाने नेहमीच पुढाकार घेतला असून हा जागतिक विक्रम सोहळा त्याच कार्याचा परिपाक आहे. या विश्वविक्रमाची नोंद घेण्यासाठी सोमय्या ग्रुपचे पांडुरंग आंबटकर, छबुताई वैरागडे (अध्यक्ष, उत्कृष्ट महिला मंच चंद्रपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीम अहोरात्र मेहनत घेतली आहे. या उपक्रमासाठी सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग आंबटकर यांचे आर्थिक सहकार्य लाभले आहे.या लावणी विक्रमाला चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद सोहळ्याचे साक्षीदार झाले.
