नागपूर : चंद्रपूर महापालिकेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी मिळून आठ सदस्यांचा गट स्थापन करण्यात आला असून आज नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालयात राहुल दुरुगकर गट यांच्या नेतृत्वात गटनोंदणी करण्यात आली आहे. चंद्रपूर महापालिकेत ठाकरे सनेचे सहा आणि वंचित बहुजन आघाडीचे दोन सदस्य आहेत.

चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार आणि चिमूरचे आमदार बंटी भांगडीया यांनी तसेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संपर्क साधला आहे. जो पक्ष आमच्या आघाडीला महापौरपद देईल त्या पक्षाला पाठिंबा देऊ, असे शिवसेनेचे (ठाकरे) संदीप गिऱ्हे यांनी सांगितले. चंद्रपूर महापालिका महापौरपदासाठी आवश्यक संख्याबळ भाजप आणि भाजप या दोन प्रमुख पक्षाकडे नसल्याने सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांमधील अंतर्गत वाद उघडपणे समोर आले आहेत.

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले असून त्यांच्या सोबत आघाडीत लढलेल्या जनविकास पक्षाचे तीन नगरसेवक आहेत. अशा प्रकारे काँग्रेस आघाडीचे एकूण संख्याबळ ३० आहे. महापौरपदासाठी बहुमत सिद्ध करण्यासाठी काँग्रेसला आणखी चार नगरसेवकांची गरज आहे.

दुसरीकडे भाजपचे २३ नगरसेवक असून त्यांच्या युतीतील शिंदे शिवसेनेचा एक नगरसेवक आहे. भाजप-शिवसेना युतीचे एकूण संख्याबळ २४ असून सत्ता स्थापनेसाठी त्यांना अजून दहा नगरसेवकांची आवश्यकता आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांकडे स्पष्ट बहुमत नसल्याने अपक्ष आणि छोट्या पक्षांचे नगरसेवक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

भाजपमधील अंतर्गत वादाने पक्षाची डोकेदुखी वाढवली आहे. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील मतभेद चर्चेत आले आहेत. जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशापासूनच या वादाची ठिणगी पडली होती. विविध पक्षांमध्ये फिरून आलेल्या जोरगेवार यांना भाजपकडून चंद्रपूर विधानसभेची उमेदवारी देण्यास मुनगंटीवार यांचा ठाम विरोध होता. परंतु तत्कालीन परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत जोरगेवार यांचा भाजप प्रवेश घडवून आणला आहे. जोरगेवार हे देखील भाजपचा महापौर बसवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.