चंद्रपूर: चंद्रपूर महापालिकेत महापौर पदाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. त्याआधी काँग्रेस महासचिव के.सी वेणुगोपाल यांच्याकडे उद्या ३ फेब्रुवारी रोजी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर तोडगा निघेल अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान वडेट्टीवार गटाचे नगरसेवक राजेश अडूर यांनी रविवारी काँग्रेस नगरसेवकांच्या बैठकीची नोटीस खासदार प्रतिभा धानोरकर गटाच्या नगरसेवकांच्या घरावर चिपकावल्याने वडेट्टीवार – धानोरकर गटात तणाव वाढला आहे.

चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर बसावा यासाठी हालचालींना सुरुवात झाली आहे. पण काही घटनांमुळे निर्णय लांबणीवर पडला असून याबाबत काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक उद्या ३ फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणार आहे. महापौर व गटनेता याबाबत पक्षश्रेष्ठींवर निर्णय सोडला असल्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. असे असले तरी यापूर्वी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सुनील केदार यांच्यासह दिल्लीतून आलेल्या निरीक्षकांसोबत बैठका झाल्यानंतरही तोडगा निघू शकला नाही. आता दिल्लीत हा विषय गेला आहे. दरम्यान वडेट्टीवार गटाचे नगरसेवक राजेश अडूर यांनी खासदार धानोरकर गटाच्या नगरसेवकांच्या घरावर नोटीस चिपकवल्याने दोन्ही गटात पुन्हा तणाव वाढलेला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधन झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. आपल्या संस्कृती नुसार दशक्रिया झाल्यावर घरातील सुरळीत कामकाज सुरू होते. पण राज्यातील राजकारण इतके सडके झाले आहे की कसलीही वाट न बघता शपथविधीचा कार्यक्रम करण्यात आला. यातूनच दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येऊ नये हा कट शिजला असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दोन्ही पक्ष विलीन होण्याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात होती. आपल्या पक्षाबाबत त्यांनी भाजप किंवा मुख्यमंत्र्यांना सांगणे अपेक्षित होते का? त्यांच्या पक्षाचे निर्णय ते घेऊ शकत नव्हते की त्यासाठी भाजपची परवानगी लागत होती? अस टोला वडेट्टीवार यांनी यावेळी लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूपेक्षा दोन पक्षाच्या विलीनीकरण बाबत जास्त चर्चा झाली.यातून काही लोकांना आनंद झाला. आपल्या मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्यावर दोन चार दिवस ही नेते थांबू शकले नाही यातून राजकारणात नैतिकता आणि नीतिमत्ता राहिली नाही हे महाराष्ट्र बघत आहे अस वडेट्टीवार म्हणाले.

अजित पवार यांच्या पक्षातील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या नेत्यांना एनडीए बरोबर राहण्याची अपरिहार्यता आहे. त्यांच्यावर विविध आरोप झाले आहेत. अशा वेळी शांत झोप लागावी यासाठी भाजपला साथ देण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही यातूनच विधान केली जात असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.अजित पवार यांच्या मृत्यूबाबत देखील विविध शंका उपस्थित केल्या जात असून या प्रकरणी निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे याचा पुनरुच्चार वडेट्टीवार यांनी केला.