चंद्रपूर :महापालिकेतील विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर या दोन काँग्रेसच्या नेत्यांच्या अंतर्गत गटबाजीचे पडसाद आता थेट नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर उमटू लागल्याचे चित्र आहे. गटनेतेपदाच्या वादातून काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाल्यानंतर नगरसेवकांना बाहेरगावी सहलीवर पाठविण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. परिणामी अनेक नगरसेवक प्रभागात उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या समस्या ऐरणीवर आल्या आहेत.

महापालिकेतील काँग्रेस गटनेतेपदावरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षामुळे धानोरकर आणि वडेट्टीवार समर्थक असे दोन गट पडल्याचे बोलले जात आहे. आपल्या गटातील नगरसेवक एकत्र राहावेत आणि राजकीय समीकरणे बदलू नयेत, यासाठी काही नगरसेवकांना बाहेरगावी नेण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

प्रभागात असंख्य समस्या

पावसाळ्याच्या प्रारंभानंतर शहरातील अनेक भागांत नालेसफाई, पथदिव्यांची दुरवस्था, रस्त्यांवरील खड्डे आणि जलनिस्सारणाच्या समस्या तीव्र झाल्या आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना आपल्या तक्रारी मांडण्यासाठी लोकप्रतिनिधींची गरज भासते. मात्र, नगरसेवकच उपलब्ध नसल्याने समस्या सोडविण्यासाठी कुणाकडे दाद मागायची, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे.

नगरसेवक बेपत्ता

प्रभाग क्रमांक १७ मधील काँग्रेसचे नगरसेवक आकाश मानकर आणि महानंद वाळके हे गेल्या काही दिवसांपासून प्रभागात दिसून न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. परिसरातील अनेक नाल्या तुंबल्या असून काही भागांत पथदिवे बंद आहेत. तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्या सोडविण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी निषेधाचा अनोखा मार्ग अवलंबला. बल्लारपूर बायपास मार्गावरील उड्डाणपुलाजवळ “नगरसेवक हरविले आहेत” असा फलक लावून त्यांनी आपला रोष व्यक्त केला. या फलकाची शहरभर चर्चा सुरू असून नागरिकांच्या असंतोषाला आता सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले आहे.

नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष

स्थानिकांच्या मते, राजकीय घडामोडी आणि गटबाजी हा पक्षांतर्गत विषय असला तरी त्याचा परिणाम नागरिकांच्या प्रश्नांवर होऊ नये. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी नगरसेवकांनी प्रभागात उपस्थित राहून प्रशासनाशी समन्वय साधणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे महापालिका राजकारणातील अंतर्गत संघर्ष पुन्हा चर्चेत आला असून, नागरिकांच्या वाढत्या नाराजीमुळे संबंधित लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेतात, याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.