चंद्रपूर: चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी सोमवारी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन केले.
नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर चंद्रपूर येथील दि ग्रँड आयकॉन हॉटेलमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती, मतदारांशी संपर्क आणि महाविकास आघाडीची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
विजय मिळविण्याचा निर्धार
बैठकीला विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, माजी मंत्री रणजित कांबळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर काँग्रेस अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी, तसेच काँग्रेस नेते विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर आणि आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राज्यातील राजकीय परिस्थिती, स्थानिक स्वराज्य संस्थांसमोरील प्रश्न आणि आगामी निवडणुकीतील एकजूट यावर नेत्यांनी मार्गदर्शन केले. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवून विजय मिळविण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले असून प्रचारयंत्रणा अधिक गतिमान करण्यावर भर देण्यात आला.
एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्न
दरम्यान, या बैठकीमुळे स्थानिक राजकारणात एका नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. चंद्रपूर महापालिकेतील राजकीय समीकरणांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे काही नगरसेवक भाजपसोबत असल्याचे चित्र आहे. महापौर निवडणुकीसह विविध विषयांवर ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा दिल्याची चर्चा यापूर्वी झाली होती.
पक्षाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, सभापती मनस्वी गिर्हे आणि काही नगरसेवक भाजपसोबत असल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात मानले जाते.अशा परिस्थितीत विधान परिषद निवडणुकीत ठाकरे गट महाविकास आघाडीच्या उमेदवारामागे पूर्ण ताकदीने उभा राहणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाच्या नेतृत्वाची उपस्थिती पाहता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती
दरम्यान, नामांकन दाखल करण्याच्या निमित्ताने चंद्रपूरमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग येण्याची चिन्हे आहेत.
